दैनिक स्थैर्य । दि. २२ सप्टेंबर २०२१ । सातारा । सातारा शहरालगत असणाऱ्या एका उपनगरातील युवतीचा विनयभंग करून बळजबरीने औषधाची बाटली तिच्या तोंडात ओतल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. राहूल अर्जून वायकर (वय २५), करण अर्जून वायकर (वय ३0) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दरम्यान, पीडित युवतीला उपचारासाठी सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात देण्यातून आलेली अधिक माहिती अशी की, पीडित युवती सातारा शहरालगत असणाऱ्या एका उपनगरात राहते. तिने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ती एकटी घरात असताना राहूलचा भाऊ करण हा दारुच्या नशेत घरात आला आणि ‘तु माझ्या भावाला ब्लॅकमेल करतेस,’ असे म्हणून शिवीगाळ करु लागला. यावेळी युवतीने करण याला त्याच्या घरी जाण्यास सांगितले. मात्र, त्याने घरी न जाता युवतीस मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर युवतीने ‘तु मला मारहाण केलीस तर मी विषारी औषध प्राशन करेन,’ असे सांगत एक औषधाची बाटली हातात घेतली. मात्र, ती बाटली करण याने हिसकावून घेत तिला खाटेवर ढकलून देत ते औषध तिच्या तोंडात ओतले तसेच करण याने पीडित युवतीच्या नातेवाईकांनाही मारहाण केली असल्याचेही तक्रारी म्हटले आहे. दरम्यान, या घटनेनंतर पीडित युवतीला उपचारासाठी सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल केले असल्याची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे.
याप्रकरणी पीडित युवतीने शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर राहूल आणि करण या दोघांवर गुन्हा दाखल झाला. रात्री उशिरा या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बशीर मुल्ला करत आहेत.