
![]() |
औषध फवारणी करताना उपसरपंच सुरेशराव काळे, सदस्य संदिप अवघडे व कर्मचारी वर्ग |
स्थैर्य, वावरहिरे, दि. २४ : वावरहिरे ग्रामपंचायतीच्या वतीने गावठाण भागात तणनाशक, डास निर्मुलनासाठी औषध फवारणी करण्यात आली. गावठाण भागात रिकाम्या जागेत व पडिक जमिनीवर गवत वाढल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ग्रामस्थांच्या मागणीनुसार ग्रामपंचायतीच्या वतीने जंतुनाशक, तणनाशक औषधी फवारणी करण्यात आली अशी माहिती ग्रामपंचायत उपसरपंच सुरेशराव काळे व ग्रामपंचायत सदस्य संदिप अवघडे यांनी दिली.
सततच्या पावसाने गावात मोठ्या प्रमाणात गवत वाढल्याने तसेच तुंबलेले नाले , तुटलेल्या गटारीमुळे सांडपाणी गटारीच्या बाहेर येवुन घरासमोर तसेच रस्त्यावर साचत असल्याने गावात घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात वाढ होत असुन दलदलीच्या वातावरणात डासांची वाढ झपाट्याने होत असल्याने गावात माश्या व डासांच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याने मलेरियासह इतर साथीच्या आजारांना पोषक वातावरण तयार होत असल्याने याचा गावात फेलाव होवु नये. आधिच कोरोनासारख्या महाभयंकर विषाणुची पायामुळे ग्रामीण भागात वेगाने पसरु लागल्याने कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण तयार होत आहे.त्यामुळे गावचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी गावात औषध फवारणी करण्यात आली.आधीच ग्रामपंचायतीचे ग्रामस्वच्छता व्यवस्थापन कोलमडले आहे.गावातील गटारी तुंबलेल्या आहेत.त्यात रोज पडणारा पाऊस यामुळे गावात डासांचे प्रमाण वाढले आहे परंतु आता या औषध फवारणीने ग्रामस्थांना थोडासा दिलासा मिळाला आहे. परंतु ग्रामपंचायतीने तुंबलेली गटारे पुर्वावत केल्यास डासाचे प्रमाण कमी होईल.तुर्तास तरी ग्रामपंचायतीच्या वतीने केलेल्या औषध फवारणीने थोडासा दिलासा मिळाला आहे .यावर कायमस्वरुपी उपाययोजना व्हाव्यात अशी मागणी ग्रामस्थांमधुन होत आहे.