कोट्यवधी रुपयांचा अंमली पदार्थाचा कच्च्या मालाचा साठा सावरीत जप्त


स्थैर्य, सातारा, दि. 14 डिसेंबर : जावळी तालुक्यातील सावरी येथे कोट्यवधी रुपयांचा अंमली पदार्थाचा कच्च्या मालाचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबई क्राईम ब्रँचच्या पथकाने (युनिट 7) ओंकार दिघे यासह चारजणांना ताब्यात घेतले आहे. गोविंद शिंदवडे यांच्या शेतातील एका शेडमध्ये सेंटेंड हुक्का बनवण्याची थाप मारून ते भाड्याने घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचचे युनिट 7 चे पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. अत्यंत गोपनीयतेने ही कारवाई केली असून सातारा पोलीस यंत्रणा या निमित्ताने अ‍ॅलर्ट मोडवर आली आहे. या शेडमध्ये एमडी चे 5 लीटर कच्चे द्रावण व इतर साहित्य आढळून आले आहे. याप्रकरणी दिघेसह अन्य तीन अशा चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. मुंबई पोलिसांच्या सूचनेनंतर सातारा पोलिसांचे एक पथक उपविभागीय अधिकारी राजीव नवले यांच्या नेतृत्वात घटनास्थळी रवाना झाल्याची माहिती मिळत आहे. मुंबई पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

बामणोली, दरे, सावरी ही जावली तालुक्यातील संवेदनशील क्षेत्रात येणारी गावे असून पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत प्रगल्भआहेत. शासकीय प्रोटोकॉलच्या निमित्ताने शासकीय यंत्रणांची येथून सातत्याने ये जा असते. असे असताना देखील बामणोली पासून काही किलोमीटर अंतरावर असणार्‍या सावरी येथे इतक्या मोठ्या प्रमाणावर एमडी चा कच्चा माल आढळावा व याचा कोणालाही थांगपत्ता लागू नये, याविषयी आश्चर्य व्यक्त होत आहे. मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांकडे कसून चौकशी सुरू केली आहे.


Back to top button
Don`t copy text!