स्थैर्य, सातारा, दि. 23 : पुण्यावरुन मेडिकल वेस्ट साताऱ्याच्या कचरा डेपोत आणून टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी घडला. परंतु सातारा नगरपालिकेने दि.14 मार्च 2016 रोजी नेचर नीड या संस्थेला ना हरकत दाखला दिला गेला आहे. त्यामुळे सध्याच्या धोकादायक परिस्थितीत सातारा पालिकेचीच चुक हे स्पष्ट होत आहे. दरम्यान, बायोमायनिंग प्रकल्पाचा नुसताच गवगवा सुरु आहे. प्रत्यक्षात अजूनही आकडेमोडच होताना दिसत आहे. त्यात साशाच्या नावाने घंटागाडीतून मलिदा हाणला आता साशाच्या नावानेच पुन्हा बायोमायनिंगमध्ये डाळ शिजवण्याचा प्रकार सुरु आहे. काही अधिकारी नगरसेवक यांची ही खटपट सुरु असून सुट्टीच्या दिवशीही सोनगाव कचरा डेपोत ड्रोन मॅपिंग सुरु होते. सातारा पालिकेतील घोटाळे थांबणार केव्हा असा सवाल सर्वसामान्य नागरिक विचारु लागले आहेत.
पालिकेत घंटागाडय़ांचे टेंडर सुरुवातीला साशा या कंपनीने घेतले होते. या कंपनीला पहिल्याच आठवडय़ात सातारा पालिकेत काम नको अशी अवस्था झाली. अन् पुढे त्या कंपनीने पळ काढला. परंतु त्याच कंपनीच्या नावावर काहींनी टेंडर पुढे दामटले आणि काम मात्र असे तसेच करुन बिल काढले. हे सातारकरांना चांगलेच ज्ञात आहे. असे असताना शहराच्या दृष्टीने महत्वाचा असलेला बायोमायनिंग प्रकल्प सोनगाव कचरा डेपोत होत आहे. त्यांची नुसतीच चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहे. मात्र, येथेही साशाच्या नावाची घुसखोरी दिसत आहे. शहरातून दररोज तयार होणाऱ्या सहा टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा ह प्रकल्प आहे. मात्र त्या प्रकल्पात बजेट वाढता वाढतच चालले आहे. सध्या 15 कोटी 34 लाखांचे बजेट करण्याचे नियोजन करण्यात आले असून त्याच्या आराखडय़ात मात्र तफावत असल्याच्या तक्रारी झाल्या आहेत. दरम्यान, टेंडर प्रक्रियेत घोटाळे होत असल्याने या प्रकल्पाचा दर्जा घसरण्याची शक्यता असून साशाच्या नावाने पुन्हा घुसखोरी पालिकेतल्या पालिकेत सुरु होत आहे. दरम्यान, सुट्टीच्या दिवशी कचरा डेपोत ड्रोनने मॅपिंग सुरु होते. त्यातील काही अधिकाऱ्यांना फोनवरुन विचारणा केली असता त्यांनी मी सुट्टीवर होतो असे सांगितले. आरोग्यामध्ये नव्याने पदभार घेतल्याने बिघडू नका, सातारकरांसाठी काम करा, असेच सातारकर म्हणतील. दरम्यान, पुण्यावरुन सातारा कचरा डेपोत आलेला मेडिकल वेस्टचे तर घोंगडे चांगलेच भिजले आहे. 2016 मध्येच सातारा पालिकेने नेचर नीड आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळाने दाखले दिले गेले आहेत. त्या दाखल्यामुळे पालिकेनेच पालिकेच्या पायावर दगड मारुन घेतल्याचा प्रकार सुरु असल्याचे दिसत आहे.