टोळधाड नियंत्रणासाठी ड्रोनच्या सहाय्याने कीटकनाशक फवारणी (पहा VDO)

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी नागपूरात केली ड्रोन प्रात्याक्षिकाची पाहणी

स्थैर्य, मुंबई, दि. 3 : मध्य प्रदेशातून नागपूर व अमरावती विभागात आलेल्या टोळधाडीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे टोळधाडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ड्रोनच्या सहाय्याने कीटकनाशक फवारणी शक्य असल्यामुळे  टोळधाडीच्या निर्मूलनासाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार असल्याची घोषणा कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केली होती, त्यानुसार आज नागपूरच्या  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या बॉटनिकल गार्डन येथे ड्रोनच्या  प्रात्यक्षिकांची कृषिमंत्री श्री. भुसे यांनी पाहणी केली.

एअरोनिका कंपनीच्या दोन ड्रोनचा वापर यासाठी करण्यात येत आहे. ड्रोनची क्षमता १० लिटर कीटकनाशक व पाणी घेऊन फवारणी करण्याची असून, क्लोरोपायरोफॉस हे कीटकनाशक वापरण्यात येत आहे. परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, कृषी सहसंचालक डॉ. रवींद्र भोसले यावेळी उपस्थित होते.

मध्यप्रदेशातून विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात ही टोळधाड आली आहे. गेल्या काही दिवसांपासून टोळधाडीमुळे शेत पिकांचे, भाजीपाला, फळबागा आदींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. नंतर ही टोळधाड पुन्हा मध्यप्रदेशातील जंगलात निघून गेली होती. त्यानंतर पुन्हा जिल्ह्यात दाखल होवू शकते. शेती पिकांचे नुकसान करणा-या टोळधाडीवर कीटकनाशकांची फवारणी हाच एकमेव उपाय असल्यामुळे ड्रोनचा वापर करण्यात येत असल्याचे कृषिमंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

आतापर्यंत कृषी व महसूल विभागाने अग्निशमन बंबांच्या सहाय्याने कीटकनाशकांची फवारणी केली आहे. मात्र अग्निशमन बंबांना जंगलातील अतिउंच व घनदाट झाडे, दरी तसेच नदीकाठावरील आणि दुर्गम भागातील झाडांवर फवारणी करण्यास मर्यादा येत होत्या. पिकांचे मोठे नुकसान करणा-या टोळधाडीवर नियंत्रण मिळविणे शक्य होत नव्हते. त्यामुळे दुर्गम भागात टोळधाड नियंत्रणासाठी ड्रोनच्या सहाय्याने कीटकनाशक फवारणी करण्याचा निर्णय निर्णय घेणार आहे.

जिल्ह्यात 25 मेपासून काटोल, सावनेर, नरखेड, कळमेश्वर, रामटेक, नागपूर, पारशिवनी आणि मौदा तालुक्यात तर भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे टोळधाडीने संत्रा, मोसंबी, आंबा, सागवान, बांबू, कडूनिंब, बाभूळ तसेच वांगे आणि चवळी, पत्ताकोबी, चारापिके, पेरु, लिंबू, पालक, भेंडी, गवार, कोथिंबीर, मका, मेथी, उन्हाळी धान, बोर, चार, किनी आंबा, मोह, अंजन आदी पिके आणि वनातील वृक्षांचे नुकसान केले. नागपूर जिल्ह्यातील तारा, उतारा, खालाआन, अर्जुननगर, आमनेर, गोदी, बैलवाडा, फेटरी, घाटरोहणा, सरका, बोरडा, तांडा या गावांमध्ये तर भंडारा जिल्ह्यातील टेमनी गावात तर अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात पिकांचे व वृक्षांचे नुकसान झाले आहे. यासाठी आवश्यकतेनुसार ड्रोनचा वापर सुफ असल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

टोळधाडीच्या आक्रमणासंबंधी कीटकशास्त्र विभागाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले आणि कीटकशास्त्र विभागप्रमुख डॉ. धनराज उंदिरवाडे यांच्या मार्गदर्शनात संबंधीत कृषी विभागाचे अधिकारी, तसेच किटकशास्त्र विभागाचे अधिष्ठाता, प्राध्यापक विविध निरीक्षणे नोंदवित आहेत.  त्यामध्ये  टोळधाडीचे आक्रमण, त्यांचा फळपिके, भाजीपाला नष्ट करण्याचा कालावधी आक्रमणादरम्यान अंडी घालणे किंवा प्रजननाची लक्षणे यांचा समावेश असल्याचेही कृषिमंत्र्यांनी सांगितले.

एअरोनिका कंपनीचे हे ड्रोन 10 लिटर कीटकनाशक व पाणी घेऊन 10 मिटर उंचापर्यंत उड्डाण करुन 15 मिनिटांपर्यंत फवारणी करु शकते. तसेच एका तासामध्ये 10 एकर परिसर फवारणीची क्षमता आहे. ड्रोनला स्वयंचलित केल्यास एका तासात दोन एकर क्षेत्रावर फवारणी शक्य असल्याची  माहिती एअरोनिका ॲडव्हान्स्ड टेक्नॉलाजीचे जीवन कुमरे यांनी दिली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!