स्थैर्य, फलटण : फलटण – पंढरपूर रोड वरील राव रामोशी पुलाजवळ असलेली कोळकीची स्मशानभूमी.
स्थैर्य, फलटण : फलटण गावाशेजारून कोळकी गावातून वाहत असलेल्या निरा उजवा कालव्या शेजारी असलेल्या कोळकी गावच्या स्मशानभूमीत होत आहेत. कोरोना बाधीत मृत व्यक्तींच्या होत असलेल्या अस्थी व रक्षा विसर्जनाने कालव्यामधील पिण्याचे पाणी दूषीत होत आहे. कालव्या शेजारी असलेल्या सर्व गावांतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
फलटण पंढरपूर येथील रावरामोशी पुलाजवळ असलेल्या व कोळकी गावासाठी बांधण्यात आलेल्या स्मशान भूमीमध्ये सध्या फलटण, माण व खटाव तालूक्यातील कोरोना बाधीत मृत व्यक्तिंचा अंत्यसंस्कार या ठिकाणी केला जात आहे. अंत्यविधी नंतर अस्थी व रक्षा विसर्जन शेजारी वाहत असलेल्या निरा उजवा कालव्यामध्येच सर्रास केले जाते. स्मशानभूमीमध्ये साधारणपणे दररोज सरासरी पाच ते दहा अंत्यविधी होत आहेत. हा कालवा श्री क्षेत्र पंढरपूरच्या पूढे वहात जात आहे. अनेक गावांचे जलशुध्दीकरण प्रकल्प याच कालव्या शेजारी उभे केलेले आहेत. फलटण तालूक्यामध्ये जाधववाडी, कोळकी, फलटण, विडणीसह अनेक गावांचे जलशुद्धीकरण प्रकल्प आहेत. रावरामोशी पुलाच्या पूढेच विडणी गावाचा जलशुध्दीकरण प्रकल्प आहे. सध्या प्रत्येक गावात कोरोना बाधीतांची संख्या वाढतच आहे. विडणीमध्येही करोना बाधीतांचा आकडा साठच्या पूढे गेला आहे. कालव्यामधील दूषीत पाण्यामुळे विडणी गावामधील ग्रामस्थांचे सुद्धा आरोग्य धोक्यात आले आहे.
वरील समस्ये बाबत विडणी ग्रामपंचायतीने प्रभारी तहसिलदार आर. सी. पाटील व फलटण नगर पालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांना निवेदन दिले आहे. त्यांनी यावर त्वरीत तोडगा काढून परिसरातील ग्रामस्थांचे आरोग्य सांभाळावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.