
स्थैर्य, शिंदेवाडी, दि. २१ सप्टेंबर : कै. सुभाषराव शिंदे (भाऊ) यांच्या जयंतीनिमित्त राजा शिवछत्रपती युवक संघ, फलटण यांच्या वतीने शिंदेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार, दि. १९ सप्टेंबर रोजी आयोजित या स्पर्धेत १२५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
या स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार श्री. अजय माळवे, श्री. अहिवळे, श्री. यशवंत खलाटे, श्री. दादासाहेब यादव, श्री. राजेंद्र शिंदे आणि श्री. ज्ञानेश्वर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेतील विजेत्यांना शिंदेवाडीचे सरपंच श्री. आनंद यादव आणि श्री. राजेंद्र शिंदे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
ही स्पर्धा तीन गटांमध्ये घेण्यात आली. गट क्रमांक तीन (इयत्ता ५ वी ते ७ वी) मध्ये कुमारी स्वरा सतीश यादव हिने प्रथम क्रमांक पटकावला. गट क्रमांक दोनमध्ये कुमारी अनुश्री पांडुरंग यादव हिने, तर गट क्रमांक एकमध्ये कुमार श्रेयस योगेश यादव याने प्रथम क्रमांक मिळवला. प्रत्येक गटातील पहिल्या पाच क्रमांकांना बक्षिसे देण्यात आली.
या कार्यक्रमासाठी शरद प्रतिभा हायस्कूलचे श्री. आत्तार आणि सौ. गायकवाड यांनी परीक्षणाचे काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. नाळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन युवक संघाचे श्री. सचिन भगत यांनी मानले. या कार्यक्रमास श्री. बाळूभाऊ शिंदे, श्री. अरुण शिंदे, श्री. संतोष शिंदे यांच्यासह गावातील नागरिक आणि शिक्षकवृंद उपस्थित होते.