फलटणच्या गिरवी नाक्यावर थरार; बनावट पिस्तुलातून गोळीबार करत चोरट्यांचा पळण्याचा प्रयत्न

पोलिसांनी मोठ्या शिताफीने आवळल्या मुसक्या; घटनेमुळे परिसरात खळबळ


स्थैर्य, फलटण, दि. ०६ ऑगस्ट : फलटण शहरातील वर्दळीच्या गिरवी नाका परिसरात आज सायंकाळच्या सुमारास एका थरारक घटनेने मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी काही संशयितांना पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी बनावट पिस्तुलातून हवेत गोळीबार करत पळून जाण्याचा प्रयत्न केल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही भुरट्या चोरांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलीस त्यांच्या मागावर होते. पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न करताच चोरट्यांनी धावपळ सुरू केली. यावेळी चोरट्यांनी आपल्याजवळील बनावट (खेळण्यातील) पिस्तुलाचा धाक दाखवत हवेत गोळ्या झाडल्या. मात्र, पोलिसांनी अत्यंत शिताफीने आणि धाडसाने या संशयितांना ताब्यात घेतले.

या घटनेत वापरण्यात आलेले पिस्तूल बनावट असल्याचे समोर आले आहे. या थरारक घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नसून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.


Back to top button
Don`t copy text!