दैनिक स्थैर्य । दि.२८ जानेवारी २०२२ । सातारा । डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना 2021-22 साठीचे परिपूर्ण प्रस्ताव दि. 11 फेब्रुवारी 2022 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे सादर करण्याचे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी यांनी केले आहे.
मदरशांमध्ये शिकत असलेल्या विविध वयोगटातील विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पारंपारिक धार्मिक शिक्षणाबरोबरच विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी व उर्दु या विषयाचे शिक्षण देणे, मुख्य प्रवाहातील शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देणे, परिणामी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये वाढ होवून त्यांची रोजगार क्षमता वाढून आर्थिक दर्जा सुधारण्यास मदत होईल या दृष्टीने मदरशांचा आधुनिकीकरणासाठी पायाभूत सुविधा, ग्रंथालयासाठी अनुदान देणे व शिक्षकांच्या मानधनासाठी अनुदान देण्याची डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यात येते.