स्थैर्य, फलटण दि.३१: उप जिल्हा रुग्णालय, फलटण मध्ये सुमारे 10 वर्षे उत्तम वैद्यकीय सेवा दिलेले डॉ. सुभाष गायकवाड यांची बारामती येथील स्त्री रुग्णालयात स्त्री रोग तज्ञ वर्ग 1 या पदावर पदोन्नतीने बदली करण्यात आली असून त्यांनी आपल्या नव्या जबाबदारीचा स्वीकार केला आहे.
उप जिल्हा रुग्णालय प्रभारी अधिक्षक म्हणून काम करताना सन 2006 ते 2012 आणि सन 2015 ते 2019 या कालावधीत केलेल्या उत्तम कामकाज आणि चांगल्या टीम वर्क मुळे राज्य शासनाने डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्काराने जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन उप जिल्हा रुग्णालयाचा गौरव केला, याच कालावधीत उप जिल्हा रुग्णालयात एआरटी सेंटर सुरु करुन फलटण, खंडाळा, माण तालुक्यातील एच. आय. व्ही. बाधीत रुग्णांची सोय झाल्याने त्यांना वेळेवर योग्य उपचाराची संधी उपलब्ध झाली. केंद्र शासनाच्या *लक्ष्य* या कार्यक्रमांतर्गत विशेष योगदान देऊन डॉ. गायकवाड यांनी गुणवत्तापूर्ण प्रसूतीचे प्रमाण उप जिल्हा रुग्णालय, फलटण येथे वाढविल्याने महाराष्ट्र शासनाचे लक्ष्य अंतर्गत विशेष मानांकन फलटणच्या उप जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाले, या रुग्णालयात आरोग्य विषयक राष्ट्रीय कार्यक्रम सतत यशस्वीरीत्या राबविण्यात डॉ. गायकवाड यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे.
मार्च 2020 पासून गेली 7/8 महिने कोरोना या साथ रोगावर मात करण्यासाठी उप जिल्हा रुग्णालय, फलटण येथे सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचार्यांचे योग्य नियोजन करुन खास कोविड उपचार हॉस्पिटल सुरु करण्यात आल्याने या तालुक्यातील कोरोना बाधीत रुग्णांना येथेच औषधोपचार व अन्य सर्व वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध झाल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले.
डॉ. गायकवाड यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. दीपक चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या सह अनेकांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.