डॉ. शिवाजीराव कदम यांना ‘इस्माईल साहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर

दि. २७ डिसेंबर २०२४ रोजी उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २५ डिसेंबर २०२४ | सातारा |
रयत शिक्षण संस्थेचे माजी मानद सचिव पै. इस्माईलसाहेब मोहम्मदसाहेब मुल्ला यांची ५१ वी पुण्यतिथी रयत शिक्षण संस्थेच्या वतीने शुक्रवार, दिनांक २७ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ४.३० वा. संस्थेच्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा या महाविद्यालयात आयोजित केली आहे. या समारंभाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तीस दिला जाणारा ‘पै. इस्माईलसाहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्कार’ यावर्षी भारती अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास संस्थेचे व्हा.चेअरमन अ‍ॅड. भगीरथ शिंदे, संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील, संस्थेचे कायदा सल्लागार अ‍ॅड. दिलावरसाहेब मुल्ला, मुल्ला कुटुंबीय, संस्थेचे इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

भारती अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांनी गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रामध्ये अतुलनीय असे योगदान दिले आहे. त्यांचा शैक्षणिक प्रवास ग्रामीण समाज जीवनातून झाला. आपल्या बुद्धिमत्तेच्या सामर्थ्यावर त्यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात रचनात्मक स्वरूपाचे कार्य केले असून कृतिशील शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासू संशोधक, वंचितांच्या शिक्षणाबद्दलची नितांत आस्था प्रत्येक ठिकाणी अधोरेखित होत आली आहे. ध्येयनिष्ठ शिक्षणतज्ज्ञ, कुशल शैक्षणिक प्रशासक, उत्साही संशोधक आणि नि:स्वार्थी समाजसेवक म्हणून ते परिचित आहेत. रसायनशास्त्रासारख्या विषयामध्ये डॉक्टरेट मिळविल्यानंतर त्यांनी अनेक वर्ष अध्ययन, अध्यापन आणि संशोधनाच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले आहे. अमेरिका, कॅनडा, सिंगापूर, श्रीलंका, जपान, थायलंड आणि फ्रान्स यासारख्या विविध देशांमध्ये आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात १७५ हुन अधिक शोधनिबंध सादर केले. आपल्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये २५ वर्षाहून अधिक काळ प्राचार्यपद त्यांनी भूषवले असून प्रकुलगुरू, कुलगुरू आणि आता सध्या भारती विद्यापीठाचे कुलपतीपदी असा त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा नोंदविला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य, आधिसभा सदस्य असे त्यांचे भरीव योगदान आहे. त्यांच्याच पुढाकाराने विद्यापीठामध्ये ‘औषध निर्माणशास्त्र’ या विद्याशाखेची निर्मिती झाली आणि या विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणून त्यांनी १५ वर्ष काम केले. विद्यापीठ अनुदान आयोग व फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया या भारत सरकारच्या दोन सर्वोच्च संस्थांवर दोन वेळा त्यांचे नामनिर्देशन करण्यात आले होते. त्यांच्या द्रष्टेपणामुळे वंचित विद्यार्थ्यांना शिक्षण घेता आले आहे. राष्ट्रीय मूल्यांकन आणि आदिसंस्कृती समितीचे सदस्य म्हणूनदेखील त्यांनी आपले योगदान दिले आहे.

रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य म्हणून त्यांनी संस्थेसाठी सर्वोत्कृष्ट योगदान दिले आहे. सामाजिक बांधिलकी असणार्‍या अनेक संस्थांमध्ये त्यांचे सदस्यत्व आहे. उच्च शिक्षण क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल भारताचे राष्ट्रपती, सरन्यायाधीश यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय कायदा दिन पुरस्कार’ व इतर अनेक संस्थांनी पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले आहे. शिक्षणाद्वारे सामाजिक परिवर्तन आणि मानवी उदात्त मूल्यांचा प्रसार त्यांनी आपल्या कृतीतून केला आहे.

अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वामुळे रयत शिक्षण संस्थेच्यावतीने दरवर्षी दिला जाणारा ‘इस्माईलसाहेब मुला जीवन गौरव पुरस्कार’ यावर्षी महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या हस्ते समारंभपूर्वक डॉ. शिवाजीराव कदम यांना प्रदान करण्यात येणार आहे.

या समारंभास शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!