आटपाडी मध्ये प्रथमच होणारे डॉ,शंकरराव खरात जन्मशताब्दी राज्यस्तरीय,साहित्य संमेलन प्रचंड यशस्वी करा ! – मा, आमदार, राजेंद्रआण्णा देशमुख यांचे आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०५ जुलै २०२२ । आटपाडी ।  दि.११ व १२ जुलै रोजी आटपाडीत होत असलेले डॉ.शंकरराव खरात जन्मशताब्दी साहित्य संमेलन सर्वार्थाने यशस्वी होण्यासाठी आटपाडी तालुकावाशियांनो प्रचंड संख्येने उपस्थित रहा,असे आवाहन साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष, माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख यांनी केले आहे.

आटपाडी येथील श्री.भवानी विद्यालय हायस्कुल आणि ज्यूनियर कॉलेज, श्रीमती वत्सलादेवी देसाई गर्ल्स हायस्कुल श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय, राजारामबापू हायस्कुल, डायनामिक इंग्लीश मेडियम स्कुल,माणगंगा कृषी तंत्रनिकेतन भिंगेवाडी, गुरुकुल विद्यालय मापटेमळा, श्रीराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आटपाडी,या शाळा-शिक्षण संस्थांना भेटी देवून विद्यार्थी-विद्यार्थीनी,शिक्षक-शिक्षिका, मुख्याध्यापक,प्राध्यापक-प्राध्यापिका,प्राचार्य,शिक्षकेतर कर्मचारी यांना तसेच ग्रामीण रुग्णालय आटपाडी येथील वैद्यकीय अधिकारी दुधाळ, आटपाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद नेमाणे, तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदार शिंदेे, यांना साहित्य संमेलनाचे निमंत्रण देताना राजेंद्रआण्णा देशमुख बोलत होते.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ग.दि.माडगुळकर,डॉ.शंकरराव खरात,व्यंकटेशतात्या माडगुळकर,ना.सं.इनामदार, भवानराव उर्फ बाळासाहेब पंतप्रतिनिधी हे पाच संमेलनाध्यक्ष देणारा आटपाडी हा वैभवशाली साहित्यिकांचा आपला तालुका आहे. माजी राज्यपाल श्री.राम नाईक,साहित्यिक व राजकारणी कै.प्रा. अरुण कांबळे यांच्यासारखे राष्ट्रीय नेते, दै.सकाळ, दै. लोकसत्तामध्ये उच्च पदस्थ , आणि आता एबीपी माझाचे संपादक राहीलेले आपल्या आटपाडीचे राष्ट्रीय पत्रकार राजीव खांडेकर, श्रीमती शांताबाई कांबळे, दिवंगत म .गो . तथा बाबा पाठक, दिवंगत बॅरिस्टर आप्पासाहेब पंत, लावणी सम्राज्ञी सत्यभामाबाई पंढरपूरकर, पैलवान नामदेव बडरे, दिवंगत शाहीर जयंत जाधव, अशा अनेक मान्यवर, महोदय, दिग्गजांची आटपाडी तालुका जननी आहे . चार दशकापूर्वीचे, तीन दशकापूर्वीचे, दोन दशकापूर्वीचे आणि नव्या पिढीतील अनेक प्रज्ञावंत आटपाडीचे नाव जागतिक स्तरावर नेत आहेत . हे सर्वांनाच भुषणावह आहे. जुन्या पिढीतल्या सर्वांचे, त्यांच्या कार्याचे, त्यांच्या साहित्याचे स्मरण व्हावे .  नवोदितांना – नवागतांना जुन्यांचा परिचय व्हावा . त्यांची महती कळावी . जुन्यांना व्यासपीठ मिळावे, प्रज्ञावंताचे साहित्य प्रकाशीत व्हावे सर्वच क्षेत्रात गाजणाऱ्यांना पाठीवर कौतुकाची थाप देता यावी. सर्वानाच प्रोत्साहन देता यावे या उद्देशाने आम्ही सर्वजण वाटचाल करीत आहोत. या दोन दिवशीय साहित्य संमेलनात अनेक दिग्गज नेते, आजी – माजी मंत्री, खासदार, आमदार, थोर साहित्यीक,लेखक, कवी, कथाकार, साहित्य प्रेमी यांचा सहभाग राहणार आहे . लग्न – समारंभ, सण – वार , उत्सव, जत्रा – उरुस, राष्ट्रीय कार्यक्रम अशा अनेक ठिकाणी आपण ज्या उत्साहाने, आनंदाने नटून थटून जातो, तोच उत्साह, आनंदाने या साहित्य संमेलनाला सर्वांनी मोठ्या संख्येने या, असे आवाहन ही राजेंद्रआण्णा देशमुख यांनी केले.

यावेळी सांगोल्याचे शिवाजीराव बंडगर आणि गोमेवाडीचे सुनिल दबडे यांनी बालगीते, लावण्या, इतर गेय कविता सादरीकरणातून सर्वांना निमंत्रण दिले . सांगोला चौकापासून एसटी स्टॅन्ड, तेथून मुख्य रस्ता बाजार पटांगण, आण्णाभाऊ साठेचौक, फुलेनगर (आबा नगर ) मार्गे जवळे मल्टीपर्पज हॉल अशी निघणारी दि ११ रोजीची ग्रंथदिडी अभूतपूर्व करण्याचे सर्वांनी उपस्थितांना साकडे घातले.

देशभर गाजलेले सर्व आटपाडी तालुकावाशीय साहित्यीक, राजकारणी, गुणवंत प्रज्ञावंत आपले आहेत. पर्यायाने माझेच आहेत . माझ्या घरचे हे कार्य आहे. राजेंद्रआण्णा समवेत आपण ही स्वागताध्यक्षच आहोत असे समजून , या श्रद्धा, आपुलकी, सदिच्छा, सदभावनेने या साहित्य संमेलनात सर्वांनी सहभागी व्हावे. प्राचार्य मुख्याध्यक प्राध्यापक शिक्षक बंधू भगिनींनी तर मोठ्या संख्येत सहभाग दर्शवून उभ्या महाराष्ट्राला हा साहित्याचा जागर अभूतपूर्व साजरा केल्याचे संपूर्ण मराठी जगताला दाखवून द्या. असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे महासचिव ज्येष्ट पत्रकार सादिक खाटीक यांनी केले.

राजेंद्रआण्णा देशमुख यांच्या साथीने आणि आजच्या संमेलनाचे उद्घाटक माजी मंत्री जयंतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत १९८७ साली माणदेशात सर्वप्रथम आपण साहित्य संमेलनाची सुरुवात आटपाडीतून केल्याचे स्पष्ट करून श्री भवानी एज्यकेशन सोसायटीचे चेअरमन रावसाहेबकाका पाटील यांनी साहित्य संमेलनासाठी ११ हजार रुपयाची देणगी जाहीर केली. सर्व शिक्षण संस्था कॉलेज हायस्कुल च्या पदाधिकाऱ्यांनी संमेलनास व ग्रंथदिंडीस जोरदार प्रतिसाद देण्याचे आश्वासन दिले.

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी या साहित्य संमेलनामध्ये स्वतःसह, श्रीराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या विविध शाखेतील शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होतील असे आश्वासन दिले.

यावेळी खानापूर आटपाडी विधानसभा मतदार संघाचे माजी अध्यक्ष आनंदरावबापू पाटील, साहित्यरत्न शंकरराव खरात प्रतिष्ठानचे सचिव विलासराव खरात, दै . प्रगल्भनायकचे संपादक लक्ष्मणराव खटके, आटपाडी कॉलेजचे प्राचार्य विजय लोंढे सर, श्री .भवानी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश नामदास सर, श्रीमती वत्सलादेवी देसाई गर्ल्स हायस्कुलच्या मुख्याधिपीका सौ विजयादेवी मोकाशी, माणगंगा कृषी तंत्रनिकेतन चे प्राचार्य सचिन खंडागळे, अभियंता मनोज पाटील, डायनामिक इंग्लीश स्कुलच्या मुख्याधिपीका सौ लक्ष्मी जाधव मॅडम, राजारामबापू हायस्कूलचे मुख्याध्यापक टी डी चव्हाण सर , देवकर सर, पाटील सर, ईषाद मुलाणी सर गुरुकुलचे मुख्याध्यापक साळुंखे सर, काळेल सर, कुरे सर, डोंगरे सर, इत्यादी अनेक जण उपस्थित होते . विविध ठिकाणी कार्यक्रमांचे सुत्रसंचालन प्रा .विजय शिंदे यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!