दैनिक स्थैर्य । दि. ९ मे २०२२ । सांगली । डॉ.शंकरराव खरात जन्मशताब्दी सांगता समारंभ व साहित्य संमेलन माणदेशी परंपरेला साजेल असे करूया, असे आवाहन जन्मशताब्दी सांगता समारोह समितीचे स्वागताध्यक्ष, माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख यांनी केले.
श्रीमंत बाबासाहेब देशमुख शेतकरी सुतगिरणीच्या कार्यस्थळावर आयोजित डॉ.शंकरराव खरात प्रेमी, माणदेशी साहित्यिक,सामाजिक कार्यकर्ते यांच्या बैठकीत राजेंद्रआण्णा देशमुख अध्यक्षस्थानावरून बोलत होते. दि. ११ व १२ जुलै २०२२ रोजी हा कार्यक्रम घेण्याचे नियोजन करण्यात आले.
राजेंद्रआण्णा देशमुख पुढे म्हणाले, जन्मशताब्दी सांगता समारंभाच्या निमित्ताने दोन दिवशीय साहित्य संमेलन घ्यायचे. यामध्ये विविध व्यासपीठाच्या माध्यमातून सर्वकष साहित्याचा, खरात साहेबांच्या लिखाण व जीवन चरित्राचा जागर करायचा. माणदेशी नव साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचे. राज्यातील नामांकित साहित्यिकांच्या प्रतिभेचा लाभ घ्यायचा. लक्षवेधी कविता, समाजाला प्रोत्साहित करणारे विचार, परिसंवादातील सडेतोड मांडणी आणि अंतकरणाचा वेध घेणाऱ्या कथांचा जागर, माणदेशी साहित्यिक आणि परंपरेचा उदघोष करायचा हा उद्देश या सांगता समारंभाचा राहणार आहे.
साहित्यप्रेमी,साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, खरात साहेबांवर प्रेम करणाऱ्या जागत्या – राबत्या आणि ध्येयवेड्या कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या समित्यांच्या माध्यमातून या उपक्रमासाठी मोठी ताकद उभी करायची आहे. आज उपस्थित राहिलेल्या सर्वांबरोबर अन्य अनेक कार्यकर्ते, साहित्यिक, साहित्य प्रेमींना यात सामावून घ्यायचे आहे. प्रत्येक पंधरा दिवसातला रविवार सर्वांनी एकत्रित येवून या उपक्रमाला गती द्यायची आहे. येत्या २२ मे च्या रविवारी पुन्हा सर्वांची मोठ्या प्रमाणावर बैठक घ्यायची आहे,असे स्पष्ट करून राजेंद्रआण्णा देशमुख यांनी डॉ. शंकरराव खरात यांचे भव्य दिव्य स्मारक उभारायचे आहे. नाट्यगृहासारखा प्रशस्त हॉल,अभ्यासिका,वाचनालय,कोच,नव्या जुन्या साहित्यिकांना प्रेरणा देणारे संस्कारपीठ आणि इतर अनेक साहित्यिक स्मारकातील विविध दालनांचा समावेश असणारे प्रशस्त बागेसहचे किमान दोन एकरातील खरात साहेबांचे स्मारक हेच आपले मुख्य ध्येय राहणार आहे. जनमाणसांवर भुरळ पाडणाऱ्या,प्रत्येकाला जागेवर खिळवून हसवून सोडणाऱ्या प्रतिभावंताना आमंत्रित करूया.त्यासाठी राज्यातील साहित्यिक, कवी,कथाकार, प्रतिभावंताची नावे संकलित करा. सर्वांच्या प्रेरणेने, विचाराने, सहकार्याने हा उपक्रम यशस्वी करायचा आहे. माणदेशी साहित्याची, साहित्यिकांची,कलाकार, कर्तृत्वसंपन्न व्यक्तीमत्वांची ही भूमी देशभर वाखाणली गेली पाहीजे, यासाठी सर्वजण सक्रीय होवू या. ना.जयंतराव पाटील,ना. विश्वजीत कदम, माजी मंत्री प्रतिकदादा पाटील, खासदार संजयकाका पाटील,आमदार अनिलभाऊ बाबर, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार सदाशिवराव पाटील वगैरे मान्यवरांना निमंत्रित करूया,असेही राजेंद्रआण्णा देशमुख यांनी म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले, संमेलनाच्या वेळी ग्रंथदिंडीचे आयोजन करूया. त्यासाठी शाळांचा सहभाग घेऊया.साहित्य परिषदेच्या माजी अध्यक्षांना अध्यक्षपदी निमंत्रित करूया. बाहेरील लोकांनाही संमेलनाचा लाभ मिळावा यासाठी आपण कसे नियोजन करता येईल हे पहावे. सर्वांनी अंग झोकून काम केल्यास संमेलन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कमी पडणार नाही,यासाठी आपली इच्छाशक्ती पाहिजे.
सांगोला येथील साहित्यिक डॉ.कृष्णा इंगोले म्हणाले, साहित्य संमेलन हे वेगवेगळ्या अंगानी साजरे करावे, डॉ. शंकरराव खरात यांची कर्तुत्वाची क्षेत्रे धरून कार्यक्रम व्हावा. साहित्य संमेलन हे संमेलनाच्या चौकटी बसविण्याबाबत रूपरेषा सांगून ते पुढे म्हणाले, माणदेशाला साहित्याची परंपरा आहे. साहित्य संमेलनांमध्ये नवोदित साहित्यिकांची नोंद झाली पाहिजे. नवोदितांना संधी देणेबाबत ठरवणे गरजेचे आहे. यातून नवे साहित्यिक निर्माण व्हावेत अशी प्रेरणा मिळेल. संमेलनाच्या निधीसाठी वेगवेगळ्या पद्धतीने आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे. अनुभवसंपन्न लोकांचा सहभाग घेऊन नियोजन केले पाहिजे. डॉ.शंकरराव खरात व त्यांचे साहित्य आणि माणदेशाच्या प्रश्नावर साहित्य संमेलनाचे नियोजन चालावे. तसेच डॉ. शंकरराव खरात प्रतिष्ठानची व्यापकता वाढवून त्यामध्ये महत्त्वांच्या लोकांचा समावेश करावा. कार्यक्रमामध्ये दरवर्षी सातत्य ठेवले पाहिजे.
ज्येष्ठ पत्रकार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक म्हणाले,कोल्हापूर,सोलापूर, पुणे, मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूं सह भालचंद्र मुणगेकर, नरेंद्र जाधव, शरणकुमार लिंबाळे,प्रज्ञा पवार या मान्यवर साहित्यिक आणि मंत्री जयंतराव पाटील ,मंत्री रामदास आठवले, मंत्री विश्वजीत कदम,प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, गवई परिवारातील मान्यवर यांना तसेच उपेक्षित, वंचित, मागास, अल्पसंख्य वर्गासह बहुजन प्राध्यापक, वकील, डॉक्टर, इंजिनियर इत्यादी अधिकारी, कर्मचारी मान्यवरांना आमंत्रित करावे. माणदेशातील साहित्यिक, साहित्यप्रेमी, हितचिंतक, प्रज्ञावंत आणि आर्थिक संपन्न समाजधुरींनी तन, मनाने यामध्ये सहभागी व्हावेच तथापि आपले स्वतःचे, माणदेशी माणसांचे कार्य समजून आर्थिक योगदानही द्यावे,असे आवाहन करून सादिक खाटीक यांनी, राजेंद्रआण्णा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली या समितीने काम करावे, असे सूचित केले. कार्यक्रमाचा कालावधी विचारात घेऊन नियोजन व्हावे. शंकरराव खरात यांचे स्मारक आटपाडीत व्हावे ही मागणी आहे, त्यावर संमेलनामधून प्रकाशझोत टाकावा. सर्वांनी आपली भूमिका योग्य पद्धतीने बजावून सामुदायिक कार्याचा यज्ञ यशस्वी करूया. डॉ. खरात यांची शैक्षणिक कारकीर्द, साहित्य यावर चर्चासत्र, परिसंवाद घ्यावेत.संमेलनाचा कार्यक्रम महाराष्ट्रव्यापी करावा. असे ही सादिक खाटीक यांनी स्पष्ट केले .
गोमेवाडी येथील साहित्यिक सुनील दबडे म्हणाले, साहित्य संमेलनांमध्ये बालसाहित्याचे व्यासपीठ असावे. नव्याने तयार होणाऱ्या साहित्यिकांवर कौतुकाची थाप दिली तर त्याला प्रेरणा मिळणार आहे, यादृष्टीने नियोजनात विचार व्हावा. बाबुराव धांडोरे म्हणाले, डॉ.शंकरराव खरात हे विविधांगी व्यक्तिमत्व आहे.त्यांची पत्रकारिता व आंबेडकरी विचार यावर प्रकाशझोत टाकणाऱ्या बाबींचा संमेलनामध्ये समावेश करावा.
विटा येथील संमेलनाचे अनुभवसंपन्न साहित्यिक रघुराज मेटकरी म्हणाले, स्मरणिका प्रकाशनाच्या आर्थिक माध्यमातून साहित्य संमेलनाचा चांगला सोहळा घडविता येतो, त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
पंढरपूर येथील भास्कर बंगाळे म्हणाले, संमेलन यशस्वी करण्यासाठी नियोजनाच्या समित्या तयार कराव्या लागतील. डॉ.शंकरराव खरात यांचे संमेलनामध्ये साहित्य उपलब्ध करून द्यावे. वेगवेगळ्या गटाच्या स्पर्धा, लेख मागवून डॉ.खरात यांचे साहित्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचता येईल .
कवठेमहांकाळ येथील बाळासाहेब रास्ते म्हणाले, डॉ.शंकरराव खरात यांच्या उज्ज्वल परंपरेला, बहुअंगी व्यक्तिमत्वाला साजेल असे साहित्य संमेलन व्हावे. माणदेशी भूमीचा जागर मातीला कळाला पाहिजे.
माळशिरस येथील डॉ. कुमार लोंढे म्हणाले, दलित साहित्यिक उपेक्षित आहेत. डॉ. शंकरराव खरात यांचे अप्रकाशित साहित्य प्रकाशित करावे, काही साहित्याचे पुनर्प्रकाशन करावे. महाराष्ट्र शासनाने उपेक्षित साहित्यिकांना पुरस्कार द्यावेत.
डॉ. सयाजीराजे मोकाशी म्हणाले, डॉ.शंकरराव खरात ग्रामीण व दलित साहित्य यांच्या सीमारेषेवरील लेखक आहेत. त्यांच्या साधेपणात मोठेपणा हरपलेला आहे. संमेलनासाठी सुकाणू समिती स्थापन करावी. त्यांचे स्मारक उभारण्या बाबत, संमेलन व यासारखे उपक्रम सातत्याने घ्यावेत.लहान वयातील मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी. ज्ञानासाठी शिक्षकाची गरज आहे. सर्वांनी संमेलन उंचीवर जाईल, असे प्रयत्न करावेत.शाळांमध्ये कोणताही उपक्रम घेतला तर डॉ. शंकरराव खरात जन्मशताब्दी निमित्ताने घेतला असे म्हणून हे उपक्रम घ्यावेत. संमेलनासाठी सुकाणू समिती तयार करावी. इटकी येथील प्रा .सिताराम सावंत म्हणाले, संमेलन विविध उपक्रमांनी व्हावे.
शंकरराव खरात प्रतिष्ठाणचे सचिव विलासराव खरात स्वागत करताना म्हणाले, शासकीय निधीतून स्मारकाच्या नियोजनाची मागणी केली आहे. यापूर्वी बैठका, परिषदा व अन्य उपक्रम घेतले आहेत. स्मारकाच्या पाठपुराव्याचा आणि जन्म शताब्दी वर्षातील आजवरच्या विविध उपक्रमाचा लेखा जोखा मांडला . गोमेवाडीच्या जीवन सावंत यांनी, आपणच साहित्य संमेलन पार पाडू, त्यासाठी यथायोग्य मदत करु, असे अन्य संस्थेच्या मदतीबाबत बोलताना म्हणाले.
आटपाडीचे माजी सरपंच शिवाजीरावतात्या पाटील म्हणाले, माणदेशात साहित्यिक, प्रज्ञावंत भरपूर आहेत. याचा प्रत्येकाला अभिमान आहे. या सर्वांच्या कर्तृत्वाला उभारी देईल असा सांगता समारंभ झाला पाहीजे . त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला .
प्रसाद देशपांडे यांनी आटपाडीचे भूमिपुत्र राम नाईक यांना संपर्क करून उपस्थित राहण्याबाबत विनंती करावी व वाचन कट्टा चळवळीला समारंभात वेळ द्यावा असे मत मांडले.
तसेच रमेश टकले, रमेश जावीर, शिवाजीराव बंडगर, विश्वनाथ जाधव, प्रा . विजय शिंदे, माजी प्राचार्य जालिंदर चव्हाण यांनी आपली मते मांडली.
यावेळी संमेलनाच्या यशस्वीते साठी स्वागत समिती, सुकाणू समिती, व्यासपीठ समिती, भोजन समिती, निवास समिती, आदी समित्या स्थापन करण्याबाबत सूचित करण्यात आले. खरसुंडी येथील काष्ठशिल्प संग्रहालयाचे रमेश जावीर यांनी संमेलनामध्ये आपल्या काष्टशिल्पाचे प्रदर्शन करण्याबाबत विचार मांडले.
डॉ.कृष्णा इंगोले यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून बैठकीचा समारोप केला.
यावेळी दिपक खरात, आप्पा खरात, नंदकुमार खरात, सुखदेव नवले, ज्ञानेश डोंगरे, विठ्ठल गवळी, वसंत विभुते, दिलीप सपाटे, महादेव खरात, काशिनाथ मोरे, स्नेहजित पोतदार, धनंजय सुतार, दिगंबर कांबळे, आनंदराव ऐवळे, बाबासाहेब वाघमारे, सर्जेराव पाटील, सुनील भिंगे, लक्ष्मणराव खटके, अरविंद चांडवले, विजयकुमार देशमुख, महादेव वाघमारे, जगन्नाथ मोरे पाटील, नारायण सावंत, ॲड. किरण पाटील, निवास शिंदे, प्रफुल्लचंद्र बाबर, प्रदीप सरवदे, धनंजय वाघमारे, इत्यादी साहित्यप्रेमी उपस्थित होते.
यानंतर आटपाडी येथील जवळे हॉल येथे संमेलन स्थळाबाबत पाहणी करण्यासाठी मान्यवरांनी भेट दिली. यावेळी स्थानिक मान्यवर व काही साहित्यिक स्वागताध्यक्ष राजेंद्रआण्णा देशमुख यांच्यासमवेत उपस्थित होते. त्यांनी याबाबतच्या नियोजनाचा प्राथमिक अंदाज घेतला.