
दैनिक स्थैर्य । 24 मे 2025। फलटण । कापशी ता. कागल येथे झालेल्या व्यसनमुक्त युवक संघाच्या 26 व्या प्रतापी संस्कार सोहळ्यात संघटनेच्यावतीने प्रतिवर्षी दिला जाणारा मानाचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार वैद्यकीय क्षेत्रात असूनही सामाजिक बांधीलकी जोपासणारे लोणंद येथील डॉ. संजय सदाशिवराव शिवदे, यांना संघटनेचे संस्थापक, युवकमित्र ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात कोल्हापूर, पुणे, नगर, नाशिक, सोलापूर, लातूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील सुमारे 700 युवक/युवती सदस्यांनी सहभागी झाले होते.
डॉ. संजय शिवदे म्हणाले, हा पुरस्कार माझ्यासाठी जबाबदारी वाढविणारा आहे. समाजातील प्रत्येक घटक व्यसनमुक्त कसा होईल, यासाठी माझे प्रयत्न राहतील. मला मिळालेला हा पुरस्कार माझे वडील ज्येष्ठ इतिहासकार कै. डॉ. सदाशिव शिवदे यांना समर्पित करतो.
संघटनेच्या महिला आघाडीच्यावतीने दिला जाणारा, राणी लक्ष्मीबाई पुरस्कार पुणे येथील ज्येष्ठ समाज सेविका श्रीमती जयश्रीताई देशपांडे यांना, राष्ट्रबंधू राजीवभाई दीक्षित पुरस्कार संघटनेचे प्रचारक कोपर्डे (ता. खंडाळा) येथील जगन्नाथ शिंदे यांना देऊन गौरविण्यात आले. या पुरस्काराचे स्वरुप सन्मानचिन्ह, मानपत्र, 11 हजार रुपये रोख, शाल व श्रीफळ व क्षात्रतेज दिनदर्शिका असे आहे. उद्योगरत्न पुरस्कार पवन घाडगे (सातारा), कृषिरत्न पुरस्कार विठ्ठल सानप (नाशिक), क्रीडारत्न पुरस्कार केशव गावडे (गोखळी) यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले.
व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्रच्या या प्रतापी संस्कार सोहळ्यात दररोज काकडा, प्राणायाम, ग्रंथवाचन, चर्चासत्र, व्याख्यान, व्यक्ती परिचय, वीर संताजी घोरपडे चरित्र, हरिपाठ, कीर्तन हे उपक्रम सलग पाच दिवस मोठ्या उत्साहात, शिस्तीने करण्यात आले. यावेळी चर्चा सत्रात व्यसनमुक्ती काळाची गरज, मोबाईल शाप की वरदान, करिअर म्हणजे काय आदी विषयावर युवक व युवतीनी आपले विचार व्यक्त केले. वृक्षमित्र ह. भ. प. शिवाजीराव मोरे (देहू), आयुर्वेदाचार्य प्रवीण पाटील (कोल्हापूर), गोसेवक सागर श्रीखंडे (निपाणी) यांच्या कार्याची समर्पक ओळख करुन देत त्यांना गौरविण्यात आले. दुपारच्या सत्रात संघटनेचे मार्गदर्शक, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक, निवृत्त अभियंता प्रमोद भापकर यांनी सर सेनापती संताजी घोरपडे यांचा जाज्वल्य इतिहास सलग 5 दिवस तपशीलवार मांडला. किशोरजी काळोखे यांनी युवकांनी व्यसनमुक्ती या विषयावर, अवधूत पाटील (कोल्हापूर) यांनी नेत्रदान चळवळ अधिक गतिमान कशी करता येईल याविषयीं अभ्यासपूर्ण माहिती दिली. प्रा. डॉ. संजीवनी पाटील (गडहिंग्लज) यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या महिला सबलीकरणासाठी केलेल्या कार्याची सविस्तर मांडणी केली. गुरुप्रसाद जोशी, सेनापती कापशी यांनी संस्कार आणि संस्कृती या विषयी विचार व्यक्त केले. शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक, निवृत्त सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी ग्रामराज्याची संकल्पना सत्यात उतरली तर राष्ट्र कसे बलशाली होईल, हे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले. कीर्तन मालिकेत ह.भ.प. विठ्ठल महाराज कंधारे, ह.भ.प. गोविंद महाराज शिंदे, ह.भ.प. केशव महाराज मुळीक, ह.भ. प. मंगेश महाराज देशमुख आदी कीर्तनकारांची कीर्तनसेवा संपन्न झाली. संघटनेचे प्रवक्ते विलासबाबा जवळ यांची विचार व्यक्त केले.
संस्कार सोहळ्याची सांगता संघटनेचे संस्थापक युवकमित्र ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली, यावेळी त्यांनी तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातील माझे गडी कोण कोण, या अभंगाच्या निरुपनाद्वारे संघटनेच्या वाटचाली बद्दल कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, गुरुप्रसाद जोशी, डॉ. प्रवीण पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास अध्यक्ष दिपक जाधव, उपाध्यक्ष नवनाथ मालुसरे, सचिव योगेश जाधव यांच्यासह संघटनेचे मार्गदर्शक, ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.