
स्थैर्य, सातारा, दि. 13 नोव्हेंबर : सातारा पालिकेच्या नगराध्यक्षपदावरून सध्या सर्वच पक्षात खल सुरू आहे. खुल्या आरक्षणामुळे इच्छुकांची गर्दीही वाढली आहे. दोन्ही राजेंनीही भाजपच्या नगराध्यक्षपदाचे नाव अद्याप जाहीर केलेले नाही; पण या निवडणुकीत भाजपला टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून दुसर्या आघाडीचे पॅनेल टाकण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याअंतर्गत नगराध्यक्षपदासाठी सर्वसामान्य, आश्वासक व उच्चविद्याविभूषित चेहरा म्हणून आपल्याला संधी द्यावी, अशी इच्छा सातारा हिल हाफ मॅरेथॉनचे जनकडॉ. संदीप काटे यांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याशी त्यांची चर्चा झाली असून, गुरुवारी (ता. 13) ते मुलाखतही देणार आहेत.
सातारा पालिकेच्या निवडणुकीत यावेळेस खासदार उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या दोन्ही आघाड्या बाजूला पडून भाजपच्या कमळ चिन्हावर एकत्र लढण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे दोन्ही राजेंच्या मनोमिलनात आता नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण असणार? याची उत्सुकता ताणली गेली आहे. भाजपकडून काल झालेल्या मुलाखतीवेळी 21 जणांनी नगराध्यक्षपदासाठी मुलाखती दिल्या
आहेत; पण अद्याप नगराध्यक्षपदाचा उमेदवार निश्चित झालेला नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व पालिकांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची यादी जाहीर करणार आहेत. त्यामुळे कोणाचे नाव निश्चित होणार, याची उत्सुकता असतानाच महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून डॉक्टर संदीप काटे हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असण्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. आपण सातारच्या नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याबाबत त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्याशी चर्चाही केली आहे. त्यांच्याया मागणीला श्री. शिंदे यांनी होकार दिला आहे.
सातारा पालिकेच्या मागील राजघराण्याच्या निवडणुकीत उमेदवाराला डावलून सर्वसामान्य घरातील महिला उमेदवाराला नगराध्यक्षपदावर सातारकरांनी निवडून दिले होते. यावेळेसही दोन्ही राजेंच्या एकत्रित भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून डॉ. काटे हे सर्वसामान्य, आश्वासक व उच्चविद्याविभूषित चेहरा म्हणून रिंगणात उतरविले जाण्याचे संकेत आहेत.

