
स्थैर्य, फलटण, दि. ३१ ऑक्टोबर : “माझं मन आजच्या कार्यक्रमात लागत नाही. २३ तारखेला भाऊबीजेला जे घडलं, त्याने फलटणच्या बाराशे वर्षांच्या इतिहासाला कलंक लागला आहे. त्या मुलीच्या भावाला काय वाटत असेल? त्यामुळे मी ठरवले आहे, माझ्या उर्वरित आयुष्यात मी भाऊबीज साजरी करणार नाही,” अशा अत्यंत भावनिक आणि संतप्त शब्दांत विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली.
होळ येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या शताब्दी महोत्सवाच्या कार्यक्रमात श्रीमंत रामराजे बोलत होते.
डॉ. संपदा यांच्या बलिदानाने ‘दहशत’ संपली; पुतळ्याची मागणी
श्रीमंत रामराजे यांनी भाषणाची सुरुवातच डॉ. संपदा मुंडे यांच्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेने केली. ते म्हणाले, “डॉ. संपदा मुंडे यांची आत्महत्या अत्यंत दुर्दैवी आहे, पण त्यांच्या या बलिदानामुळे तालुक्यातील ‘प्रशासकीय दहशत’ आज संपलेली आहे. कामगार-कर्मचाऱ्यांचे फोन येणे थांबले आहे.”
याच मुद्द्यावरून प्रशासनावर घणाघाती आरोप करताना श्रीमंत म्हणाले, “इतकी वर्षे मी आमदार फंड वाटला, एका कॉन्ट्रॅक्टरकडून एक पैसा घेतला नाही. आता आमदार फंडाच्या कामासाठी १५ टक्के द्यावे लागतात. अशी नमुने (अधिकारी) इथे आणली गेली.”
“त्या मुलीचे उपकार आपल्याला फेडावेच लागतील. मी सरकारकडे मागणी करणार आहे की, त्या मुलीचा अर्ध पुतळा उपजिल्हा आरोग्य केंद्रासमोर लावा. सरकारने नाही लावला, तर मी माझ्या खर्चाने तो उभा करीन,” अशी ठाम भूमिका श्रीमंत रामराजे यांनी यावेळी जाहीर केली.
“पाटलांनी माझा फोटो देवघरात लावावा, आता १०० कोटींची नोटीस देणार”
मागील काही दिवसांपासून साखरवाडी कारखान्यावरून आरोप करणाऱ्या प्रल्हाद पाटील (साळुंखे) यांचा श्रीमंत रामराजे यांनी अत्यंत परखड शब्दांत समाचार घेतला. “प्रल्हाद पाटील, तुमचं वय वाढलं, पण बुद्धी वाढली नाही. एका पोत्यावर चार बँकांकडून कर्ज काढणारा माणूस तुम्ही! कारखाना चालवायला जमला नाही, हे एकदा तरी कबूल करा,” अशा शब्दांत त्यांनी टीका केली.
श्रीमंत रामराजे पुढे म्हणाले, “शरद पवारांनी मला सांगितले होते की त्यांच्या (पाटलांच्या) भानगडीत पडू नका, पाटलांचे घरदार विकले जाईल. तरी मी तालुक्याचा माणूस म्हणून तुम्हाला वाचवले. तुम्ही माझा फोटो स्वतःच्या देवघरात लावून माझी पूजा केली पाहिजे. ते कर्ज तुमच्या अंगावर गेले असते.”
“काल-परवा कोणीतरी एका बाईला ५० कोटींची नोटीस दिली. आता मी प्रल्हाद पाटलांना दोन दिवसांत १०० कोटींची बदनामीची नोटीस देणार आहे. होऊनच जाऊ द्या आता. तुम्ही खपली काढली आहे,” असे थेट आव्हानच त्यांनी दिले.
रामराजेंनी एक आत्महत्या वाचवली : श्रीमंत संजीवराजे
तत्पूर्वी, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनीही साखरवाडी कारखान्याच्या आठवणींना उजाळा दिला. “२०१७-१८ साली कारखान्याचा अख्खा सीजन गायब झाला. शेतकऱ्यांना, कामगारांना पैसे मिळाले नाहीत. त्यावेळी रामराजे साहेबांनी एनसीएलटीच्या माध्यमातून दत्त इंडियाला आणून हा कारखाना सुरू केला आणि हजारो शेतकरी-कामगारांना वाचवले. श्रीमंत रामराजेंनी साखरवाडीतील एक आत्महत्या वाचवली आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
यावर श्रीमंत रामराजे म्हणाले, “मी जर लक्ष घातले नसते, तर एनसीएलटीमधून कारखाना सहा महिन्यांत लिक्विडेशनमध्ये निघाला असता. एकाही कामगाराला परत नोकरीवर घ्यायची गरज नव्हती.”
“संस्कृती बिघडवू नका” “
माझ्या ३० वर्षांच्या राजकारणात मी हा तालुका विकासाच्या दिशेने नेला. हे पाणी मी आणले. आम्ही त्यागाने आणि रक्ताने ही ८४ गावे सांभाळली आहेत. आमची एक संस्कृती आहे. आमची माणुसकीला काळीमा लावणारी लोकं आमच्या घरात आम्हाला चालत नाहीत. कृपा करून फलटण तालुक्याची संस्कृती बिघडवू नका,” असे भावनिक आवाहनही त्यांनी शेवटी केले.
 
					 
					 
					 
					
 
					 
					 
					 
					 
					 
					