दैनिक स्थैर्य | दि. ८ जानेवारी २०२५ | फलटण |
फलटणसारख्या निमशहरी गावात गेल्या ७ वर्षांपासून डॉ. प्रसाद जोशी, डॉ. सौ. प्राची जोशी आणि त्यांचे सहकारी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करून तरुणांना शारीरिक व्यायामाचा संदेश देण्याचा प्रयत्न करत असल्याबद्दल समाधान व्यक्त करतांना त्यांच्या या सामाजिक कार्याला माझा सलाम आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते महेश मांजरेकर यांनी केले.
आपली फलटण मॅरेथॉन २०२४ – २५ या स्पर्धेचा शुभारंभ राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. सचिन पाटील, भाजप तालुकाध्यक्ष अमोल सस्ते, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी ‘फ्लॅग ऑफ’ करून सकाळी केला.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होऊन समारंभात प्रख्यात अभिनेते महेश मांजरेकर, माजी आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, मिलिंद नेवसे, आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धक सादिया सय्यद, प्रा. शामराव जोशी, डॉ. प्रसाद जोशी, डॉ. सौ. प्राची जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. त्याप्रसंगी मांजरेकर बोलत होते.
शारीरिक तंदुरुस्तीसाठी योग्य आहार आणि व्यायाम ही काळाची गरज
शारीरिक तंदुरुस्तीसाठी योग्य आहार आणि व्यायाम ही काळाची गरज बनल्याचे स्पष्ट करताना या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भाग घेतलेले सर्वच स्पर्धक हे विजेते असल्याचे नमूद करीत आपण स्वतः पुढील वर्षी फलटण मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे महेश मांजरेकर यांनी सांगितले.
येथील स्पर्धक राज्य व राष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये पाठवा
४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)
डॉ. प्रसाद जोशी यांनी सांधेरोपण केलेले ज्येष्ठ स्त्री – पुरुष या स्पर्धेत सहभागी झाले, हे कौतुकास्पद असल्याचे सांगत त्यांचेसह स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांचे महेश मांजरेकर यांनी अभिनंदन केले. फलटण मॅरेथॉन स्पर्धकांनी राज्य व देश पातळीवरील मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहनही यावेळी महेश मांजरेकर यांनी केले.
डॉ. जोशी यांची आरोग्य संवर्धनाची प्रेरणा कौतुकास्पद
उत्तम आरोग्य, शरीर तंदुरुस्त असेल तर मानसिकदृष्ट्या मजबूत राहता आल्याने आपले जीवन सुखकर होते, ही संकल्पना घेऊन डॉ. प्रसाद जोशी गेली ७ वर्षे आपली फलटण मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करतात आणि तरुणासोबत सर्व वयोगटातील स्त्री – पुरुष नागरिकांना आरोग्य संवर्धनाची प्रेरणा देतात. हे कौतुकास्पद असल्याचे आवर्जून सांगत ग्रामीण विकासमंत्री ना. जयकुमार गोरे यांनी सर्वांना धन्यवाद दिले.
व्यायाम करा, लवकर झोपा, लवकर उठा, आवश्यक तेवढेच खा…
सर्वजण चरितार्थासाठी आपला उद्योग, व्यवसाय करताना, धकाधकीचे जीवनात सतत संघर्ष करतात. त्यामध्ये नियमीत व्यायामासाठी थोडा वेळ काढा, लवकर झोपा, लवकर उठा, आवश्यक तेवढेच खा, हा मंत्र डॉ. जोशी या मॅरेथॉनच्या माध्यमातून देतात. त्याचे पालन करा, असे आवाहन ना. गोरे यांनी केले.
गड चढून उतरण्याच्या स्पर्धांचे आयोजन करा
फलटण शहरानजीक असलेल्या संतोषगड, वारूगड, जरंडेश्वर व इतर गड चढून उतरण्याच्या स्पर्धेचे आयोजन करावे, अशी अपेक्षा व्यक्त करताना तरुणांनी भरपूर व्यायाम करावा, निरोगी आरोग्य जगावे, असे आवाहन आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी अध्यक्षीय भाषणात केले.
फलटण मॅरेथॉन आंतरराष्ट्रीय पातळीवर न्या…
डॉ. प्रसाद जोशी व त्यांच्या सहकार्यांनी गेली ७ वर्षे सातत्य राखून प्रत्येक वर्षी या स्पर्धेला अधिक चांगले स्वरूप देण्याचा केलेला प्रयत्न आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद निश्चित कौतुकास्पद असल्याचे सांगताना ‘सातारा मॅरेथॉन’ ही जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. त्या पार्श्वभूमीवर फलटण मॅरेथॉन स्पर्धेत राज्य, देश व आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धकांचा सहभाग नोंदवून डॉ. प्रसाद जोशी यांनी फलटण मॅरेथॉन आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्याकरिता प्रयत्न करावेत, यातच आपल्याला खरा आनंद असल्याचे आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आवर्जून सांगितले.
प्रत्येक वर्षी स्पर्धकांची संख्या वाढते आहे
प्रारंभी डॉ. प्रसाद जोशी यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्ताविकात गेल्या ७ वर्षात आपली फलटण मॅरेथॉनमध्ये विविध वयोगटातील स्पर्धक, विशेषतः आपण ज्यांचे सांधेरोपण केले ते वयोवृध्द स्त्री – पुरुष स्पर्धक आत्मविश्वासाने सहभागी होतात, नव्याने रोबोटिक यंत्रणेद्वारे सांधेरोपण केलेले स्पर्धकही यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले, हे प्रेरणादायी असून त्यामुळेच प्रतिवर्षी स्पर्धकांची संख्या वाढत असल्याचे डॉ. प्रसाद जोशी यांनी निदर्शनास आणून दिले.
मान्यवरांचे आदर्श व विचार तरुणांसमोर ठेवण्याचा प्रयत्न
स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील नामवंतांना पाचारण करून त्यांचे विचार, त्यांचे आदर्श समाजासमोर विशेषतः तरुण पिढीसमोर ठेवण्याचा प्रयत्न आपण या निमित्ताने करीत असल्याचे डॉ. प्रसाद जोशी यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.
आपली फलटण मॅरॅथॉन स्पर्धेमध्ये फलटण, सातारा, कराड, वाई, कोल्हापूर, अहमदनगर, अमरावती, अकोला, नागपूर, पुणे आणि मुंबई येथून विविध वयोगटातील सुमारे १३०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतल्याचे डॉ. प्रसाद जोशी यांनी निदर्शनास आणून दिले.
डॉ. सौ. प्राची जोशी यांनी समारोप आभार प्रदर्शन, नवनाथ कोलवडकर यांनी सूत्रसंचालन केले.
प्रत्येक गटातील पहिल्या ३ विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे १० हजार, ७ हजार, ५ हजार रोख आणि स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.