स्थैर्य, सातारा, दि.३१: सातारा येथील प्रसिद्ध सामाजिक व राजकीय कार्यकर्ते डॉ सदानंद पां. कोल्हटकर ( वय ८६) यांचे आज पहाटे सातारा येथील मंगलमूर्ती हॉस्पिटलमध्ये ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर संगममाहुली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या मागे विवाहित मुलगा किरण , दोन सुना, तीन नातू असा कौटुंबिक परिवार आहे. अंत्यसंस्कारावेळी डॉ. सदानंद कोल्हटकर यांची सुन श्रीमती मंजुश्री पंकज कोल्हटकर , मोहन साठे , संदेश शहा, विजय मांडके , अभय गोडबोले आदी उपस्थित होते.
सातारचे नगराध्यक्ष म्हणून असलेले स्मृतीशेष डॉ. पां.के. कोल्हटकर यांचे चिरंजीव असलेले डॉ सदानंद कोल्हटकर यांनी सातारा शहरातील मोती चौकाजवळ प्रतापगंज पेठेत अनेक वर्षे वैद्यकीय व्यवसाय केला. जर्मन भाषेचे गाढे अभ्यासक होते. अभ्यासासाठी व रुग्णसेवा करण्यासाठी ते जर्मनीलाही गेले होते. सातारा शहर काँग्रेसचे अध्यक्ष म्हणुनही त्यांनी काम केले होते. इंदिरा गांधी यांचे कट्टर समर्थक असलेले डॉ सदानंद कोल्हटकर यांनी काँग्रेसचे अनेक कार्यक्रम राबविले होते. भारत – सोविएत मैत्री संघाचे त्यांनी काम केलं आहे. शेवटची काही वर्षे ते आनंदाश्रम व नंतर मंगलमूर्ती केअरटेकर मध्ये राहत होते.