स्थैर्य, फलटण, दि. २५: फलटण मधील साक्षात धन्वंतरी म्हणून ओळखले जाणारे प्रथितयश फॅमिली डॉक्टर डॉ. रामचंद्र श्रीपाद उपळेकर यांचे आज (दि.२४ एप्रिल) निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगी, एक विवाहित मुलगा व नातवंडे आहेत. त्यांच्या पत्नी डॉ. सौ. शालिनी उपळेकर यांचे १९९४ मध्ये निधन झाले होते. तेव्हापासून ते आपले धाकटे बंधू विजय उपळेकर यांच्यासोबतच राहात असत.
९ फेब्रुवारी १९४३ रोजी जन्मलेल्या डॉ. उपळेकरांचे वैद्यकीय शिक्षण पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेजमधून झाले. त्यानंतर काही काळ ते रुबी हॉल क्लिनिकमध्ये होते. डॉ. ग्रँट यांचे ते फार लाडके विद्यार्थी होते.
१९७१ साली त्यांनी फलटणमध्ये आपला वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. अत्यल्प फीमध्ये रुग्णांवर उपचार करणारे हुशार, निष्णात व अतिशय हसतमुख डॉक्टर म्हणून ते सुप्रसिद्ध होते. प.पू. गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या कृपेमुळे डॉ. रामचंद्र उपळेकरांचे रोगनिदान अचूक असल्याने उपचारासाठी फार लांबून रुग्ण त्यांच्याकडे येत असत. त्यांनी फलटणमध्ये पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ रुग्णसेवा केली.
कमीतकमी औषधांचा वापर, अल्प फी आणि दिलखुलास बोलणे व वागणे यांमुळे ते फलटण परिसरातील फार लोकप्रिय फॅमिली डॉक्टर होते. त्यांनी फलटणातील तीन पिढ्यांवर उपचार केले. गरीब रुग्णांकडून अनेकवेळा ते कसलीही फी घेत नसत. फलटणच्या शेती शाळेत शिकणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांकडूनही त्यांनी कधीच फी किंवा औषधांचे पैसे घेतले नाहीत. त्यांच्या निधनाने एक देवमाणूस हरपल्याची भावना अनेकांच्या मनात दाटून आलेली आहे.