सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदी डॉ.प्रिया शिंदे उपाध्यक्षपदी राजू भोसले यांची निवड

सातार्‍यात ’ऑपरेशन लोटस’; राष्ट्रवादी-शिंदेसेनेकडे बहुमत असतानाही जिल्हा परिषद अध्यक्षपद भाजपाकडे


सातारा – डॉ. प्रिया शिंदे यांचे स्वागत करताना श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, ना. जयकुमार गोरे. त्यावेळी माजी आमदार दिलीप येळगावकर, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, शशिकांत पिसाळ.

स्थैर्य, 20 मार्च, सातारा : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत भाजपचे तोडफोडीचे राजकारण व ’ऑपरेशन लोटस’ यशस्वी झाले. राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिंदेसेनेचे 35 चे बहुमत असतानाही भाजपाच्या फोडाफोडीच्या राजकारणाने त्यांचा पराभव झाला.

सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षडॉ. प्रिया शिंदे यांची आणि उपाध्यक्षपदी राजू भोसले यांची निवड झाली. विशेष म्हणजे डॉ.प्रिया शिंदे या शिंदेसेनेचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी मिळाली आहे.गेल्या महिनाभरापासून प्रतीक्षेत असलेल्या सातारा जिल्हा परिषदेच्या निवडीअसल्याने जिल्हा परिषद परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. सर्व सदस्यांना कडक सुरक्षा व्यवस्थेत जिल्हा परिषदेत आणण्यात आले.

यावेळी संपूर्ण परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.सातारा जिल्हा परिषद सत्तेसाठी भाजपने शेवटच्या क्षणापर्यंत जोरदार फील्डिंग लावली होती. तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिंदे गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आपापसातील समन्वय कायम ठेवण्याचा प्रयत्न केला होता. पण, यामध्ये भाजपाने मोठे यश मिळवले आहे.

श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे, ना. जयकुमार गोरे व रणजितसिंह निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सत्ता काबीज
सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ही राजकीय बाजी मारली. तसेच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आखलेली रणनीतीही यशस्वी ठरल्याचे मानले जात आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीपूर्वीपासूनच भाजप नेत्यांनी सातार्‍यात ठाण मांडून हालचाली सुरू ठेवल्या होत्या.

राष्ट्रवादी व शिवसेनेचे बहुमताचे संख्याबळ निष्फळ; सदस्य फुटले..निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्र येत सत्ता स्थापनेचा दावा केला होता. दोन्ही पक्षांचे एकत्रित संख्याबळ भाजपपेक्षा अधिक असतानाही त्यांना अध्यक्षपद मिळवता आले नाही. मतदानाच्या आधी काही सदस्य फुटल्याची अफवा खरी ठरली. सदस्यांनी भूमिका बदलल्याने सत्तेची समीकरणे अचानक बदलली.

एका मताने सत्ता भाजपकडे..

जिल्हा परिषदेत भाजपचे 27, राष्ट्रवादी काँग्रेसचे 20 आणि शिवसेनेचे 15 सदस्य निवडून आले होते. बहुमतासाठी 33 सदस्यांची गरज होती. परंतु त्यातही अध्यक्षपदाच्या निवडीत भाजपला 32 मते मिळाली, तर विरोधी राष्ट्रवादी व शिवसेनेला 31 मतांवर समाधान मानावे लागले. एका मताच्या फरकाने भाजपने सत्ता मिळवली.

अध्यक्षपदासाठी चुरशीची लढत..

राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना आघाडीने अध्यक्षपदासाठी सौ. मनीषा फडतरे आणि उपाध्यक्षपदासाठी अशोकराव पाटील यांना उमेदवारी दिली होती. तर भाजपने डॉ.सौ. प्रिया शिंदे आणि राजू भोसले यांना उमेदवारी दिली होती. अत्यंत चुरशीच्या या निवडणुकीत शेवटच्या क्षणी झालेल्या घडामोडींमुळे निकाल भाजपच्या बाजूने लागला.

’ऑपरेशन लोटस’ यशस्वी..या विजयामागे शिवसेना व राष्ट्रवादीतील काही सदस्यांनी ऐनवेळी बाजू बदलली. तर राष्ट्रवादीच्या काही सदस्यांवर तक्रारी नोंदवून पोलिसांच्यावतीने रात्री गुन्हा दाखल केल्याचीही माहिती मिळते. त्यामुळे त्यांना पोलिसांनी जिल्हा परिषद परिसरातून ताब्यात घेतल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात होती. त्यामुळे भाजपला आवश्यक संख्याबळ मिळाले आणि त्यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष दोन्ही पदांवर विजय मिळवला.
निवडणुकीच्या दिवशी जिल्हा परिषद परिसरात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. निकालाची उत्सुकता आणि सुरू असलेल्या राजकीय हालचालींमुळे वातावरण सकाळपासूनच तापलेले होते.

या सत्तांतरामुळे सातारा जिल्ह्यातील राजकारणात नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शिवसेना व राष्ट्रवादीतील काही सदस्यांची फूट किंवा ऑपरेशन लोटस यामुळे भाजपचा विजय निश्चित झाला. यामुळे आगामी राजकीय घडामोडींवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Back to top button
Don`t copy text!