
स्थैर्य, फलटण, दि. १७ नोव्हेंबर : फलटण नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक १२ मधून भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (खासदार गट) यांच्या महायुतीतर्फे डॉ. प्रवीण आगवणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे या प्रभागातील लढत चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
डॉ. प्रवीण आगवणे हे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार आहेत. त्यांच्या पाठीशी महायुतीच्या दोन्ही प्रमुख पक्षांची ताकद असल्याने त्यांनी प्रभागातील विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.
प्रभाग क्रमांक १२ मध्ये स्वामी विवेकानंद नगर, दत्तनगर, हणमंतराव पवार हायस्कूल परिसर आणि सफाई कामगार कॉलनी या भागांचा समावेश होतो. या सर्व परिसरात डॉ. आगवणे यांचा चांगला जनसंपर्क असून, त्यांनी प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे म्हटले आहे.
डॉ. प्रवीण आगवणे यांनी अर्ज दाखल केल्यामुळे प्रभागातील राजकीय वातावरण तापले आहे. महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या उमेदवारीमुळे उत्साहाचे वातावरण पसरले आहे. आता इतर गट या आव्हानाला कसे सामोरे जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

