दैनिक स्थैर्य | दि. १८ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
खर्या अर्थाने जे सेवा करतात आपण त्यांनाच देव मानतो. डॉ. प्रसाद जोशी हे आपल्यासाठी देवच आहेत. आरोग्य तंदुरूस्त व सुदृढ राहण्यासाठी ते प्रेरित करतात. डॉ. जोशी योजना राबविणार्या व्यक्ती असून आपणास अशा व्यक्तीची गरज असल्याचे सांगत जोशी हॉस्पिटलच्या माध्यमातून सुरू असणारे उपक्रम आदर्शवत असून माझं नाव ‘कृष्ण’ असले तरी डॉ. जोशी हेच आमच्यासाठी कृष्ण असल्याच्या भावना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केल्या.
येथील सजाई गार्डनमध्ये जोशी हॉस्पिटल व फलटण रोबोटिक सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या “आपली फलटण मॅरेथॉन” मधील विजेत्यांच्या बक्षीस वितरण समारंभात पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे माजी सभापती आमदार तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, प्रल्हादराव साळुंखे पाटील, दिलीपसिंह भोसले, अॅड. सौ. मधुबाला भोसले, सचिन सूर्यवंशी बेडके, जयश्री जोशी, पोलीस निरीक्षक सुनील शेळके, ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ, अरविंद मेहता, प्रा. रमेश आढाव आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
“शरीरमाद्यं खलु धर्मसाधनंम” म्हणजे शरीर हेच आपली कर्तव्य पूर्ण करण्याचे सर्वोत्तम साधन असून ते धर्म जपण्याचे माध्यमही आहे. शरीराला आपण साधलं नाही तर आपली सर्व कर्तव्य अपूर्ण राहतील. कर्तव्य करताना शरीर प्रसन्न राहणार नाही. स्वास्थ्य व तंदुरुस्ती प्रथमस्थानी असावी. मनुष्य जेव्हा व्यसनाच्या आहारी जातो तेव्हा त्याचे मन स्वयंसशक्त नसते, सशक्त बनण्यासाठी ‘हॅपी हार्मोन्स’ जागे करावेत. ज्यावेळी आपण व्यायाम करतो, लोकांशी हितगुज करतो तेव्हा हॅपी हार्मोन्स आपणास परावर्तित बनवत नसतात, स्वावलंबी बनवतात, असे सांगत जोशी हॉस्पिटल गेल्या अनेक वर्षांपासून राबवित असलेले उपक्रम आदर्शवत असल्याचे कृष्ण प्रकाश यांनी यावेळी सांगितले.
दुर्गा सप्तशती पंचम अध्यायाचा दाखला देत कृष्ण प्रकाश म्हणाले, मानवाला फक्त बुद्धी, आशा, तृष्णा, एवढेच दिले नाही तर शक्तीही दिली आहे. जोपर्यंत आपल्यात शक्ती नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीही विचारणार नाही. शक्ती आपल्या आत असते. शक्तीसाठी इकडे तिकडे भटकण्याची गरज नसते. आज फक्त युवाशक्ती असून उपयोग नाही. ही युवाशक्ती बॉम्ब बनू शकते. बेरोजगार व नशा करणारे युवक देशासाठी बॉम्ब असल्याची खंत व्यक्त करीत युवकांच्या शक्तीचा सदुपयोग व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी केली.
पूर्वी चीन ऑलिम्पिक चॅम्पियन कधीच नव्हता. चीनने ३ हजार ऑलिम्पिक शाळा, जिम, मैदाने तयार केली, त्यामुळे ते आज ऑलिम्पिक चॅम्पियन बनत आहेत. भारताने १०७ मेडल घेतल्यानंतर आपण आनंद व्यक्त करतो. मात्र, चीनने २०० पेक्षा जास्त सुवर्णपदके जिंकली आहेत. आपणास जर त्यांच्या पुढे जायचे असेल तर आपल्या मुलांना लहानपणापासूनच शारीरिकदृष्ट्या तंदुरूस्त बनवले पाहिजे, असे कृष्ण प्रकाश यांनी यावेळी सांगितले.
आनंद खेळण्यात, धावण्यात आहे. दारू, ड्रग्जमध्ये नाही. काही लोक ब्रह्मचारी अवस्थेमध्ये, शिकण्याच्या अवस्थेमध्ये ड्रग्ज दारू घेतात. ही एक नवीन परंपरा सुरू झाली असून लोक यामध्ये आनंद शोधत आहेत; परंतु जो आनंद व्यायाम, खेळात मिळतो, तो आनंद प्रकृतीच्या विरुद्ध जाऊन केलेल्या कार्यात मिळत नसल्याचे सांगत क्षणिक आनंद आपल्याला परावलंबित बनवित असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वात सिद्ध होण्याची अफाट क्षमता आहे. मात्र, आपण ते सिद्ध करीत नसतो. तुम्ही जेव्हा स्वतःला सिद्ध करता तेव्हा तुम्ही कोणावरही अवलंबून राहत नसता. नवरात्रीतील नऊ दिवसांची उपासना ही सिद्ध करण्यासाठीच असते आणि अशा काळात डॉ.जोशींनी आयोजित केलेली मॅरेथॉन अभिनंदनीय असल्याचे कृष्ण प्रकाश यांनी यावेळी सांगितले.
‘फोर्स वन’ काय? असा प्रश्न श्रीमंत रामराजेंनी कृष्ण प्रकाश यांना विचारला असता ते म्हणाले, २६/११ हल्ल्याच्या वेळी आम्हाला एनएसजीची गरज भासली होती, त्यावेळी २००८ मध्ये राज्य शासनाने एनएसजीच्या धर्तीवर ‘फोर्स वन’ स्थापना केले. हे दहशतवाद विरोधातील एक विशेष युनिट आहे. यामध्ये प्रत्येक सैनिक, जवान यांचा समावेश असून अतिरेकी समोर आले तर त्यांना डायरेक्ट मारण्याचे अधिकार दिले आहेत. या ‘फोर्स वन’ युनिटचा प्रमुख म्हणून माझी नेमणूक करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
श्रीमंत रामराजे म्हणाले, कृष्ण प्रकाश साहेब आपल्या ३० वर्षांच्या राजकारणात मी अनेक पोलीस अधिकारी पाहिले. मात्र, आज अस्खलित संस्कृत, रामायण योग्यवेळी कोट करून बोलणारा अधिकारी मी पाहिला नसून पोलीस अधिकार्याकडून तरी मला हे अपेक्षित नव्हते. तुम्ही म्हणाला, मला बदलीची भीती नसते; परंतु ८० टक्के पोलीस अधिकारी बदलीलाच घाबरतात. आमच्यासारख्या राजकारणी मंडळींच्या अपेक्षा मतांच्या असतात; परंतु सर्वसामान्यांना वाटते पोलिसांनी न्याय द्यावा. आपल्यासारखे अधिकारी महाराष्ट्राला मिळाले हे महाराष्ट्राचे नशीब असल्याचे सांगत जोशीसाहेब ही शक्ती फलटणला आणली ते बरं केलं, अशा प्रकारचे अधिकारी आपल्याला अजून ३० टक्के मिळाले तर कदाचित राजकारणी लोकांचे वाईट होईल. मात्र, सर्वसामान्य माणसांचे चांगले होणार असल्याचे श्रीमंत रामराजे यांनी यावेळी स्पष्ट केले.
जोशी डॉक्टरांनी सांधेरोपणमध्ये मोठं नाव कमावले आहे. फलटण पूर्वी संस्थान होते आणि त्या काळात काही घरं होती. त्यामध्ये जोशींचे घर होतं आणि जोशी हे फलटणचे ओरिजिनल आहेत. दिवसरात्र ऑफिस करणारी काही मंडळी मी पाहिलीत. मात्र, जोशी दाम्पत्य फलटणमध्ये सोशल व मेडिकल दायित्व जपत ‘बॅलन्स लाईफ’ जगत असून त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप काही असल्याचे रामराजे यांनी यावेळी सांगितले.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, अॅड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. प्रसाद जोशी यांनी केले. आभार डॉ. सौ. प्राची जोशी यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक नवनाथ कोडवलकर यांनी केले. दरम्यान, विविध वयोगटातील मॅरेथॉनमधील विजेत्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास जोशी हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.