
नवीन वर्षात सुदृढ आरोग्यासाठी अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांनी ५ महत्त्वाचे मंत्र दिले आहेत. सूर्योदय, व्यायाम आणि आहाराचे महत्त्व जाणून घ्या.
स्थैर्य, फलटण, दि. ०१ जानेवारी : सरत्या वर्षाला निरोप देत आणि २०२६ च्या नवीन वर्षाचे स्वागत करताना प्रत्येकाने सुदृढ आरोग्याचा संकल्प करणे आता काळाची गरज बनली आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे आजार आता वयाच्या पन्नाशीऐवजी विशी-तिशीतच डोके वर काढू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर, “तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात,” असा संदेश देत अस्थिरोग शल्य चिकित्सक डॉ. प्रसाद जोशी यांनी निरोगी आयुष्यासाठी पाच सूत्री कार्यक्रम दिला आहे.
जीवनशैलीतील बदल आणि आजार
डॉ. जोशी यांनी सध्याच्या जीवनशैलीवर बोट ठेवताना सांगितले की, व्यायामाचा अभाव, बैठी जीवनशैली आणि मानसिक ताणतणावामुळे आपणच आपले आरोग्य धोक्यात आणले आहे. तरुण पिढी व्याधींनी ग्रासली असून, हे चित्र बदलण्यासाठी केवळ संकल्प करून चालणार नाही, तर आजपासूनच कृती करणे आवश्यक आहे.
आरोग्याचे ५ महामंत्र
यावेळी डॉ. प्रसाद जोशी यांनी दैनंदिन जीवनात पाळावयाचे पाच नियम सांगितले:
१. सूर्योदय आणि व्हिटॅमिन डी: रोज सकाळी सूर्योदय पाहिल्यास मनाला आनंद आणि ऊर्जा मिळते. सूर्य उगवल्यानंतर तासाभरात कोवळी किरणे अंगावर घेतल्यास नैसर्गिक ‘व्हिटॅमिन डी’ मिळते, ज्यामुळे हाडांचे आजार टाळता येतात.
२. नियमित व्यायाम: स्वतःसाठी रोज अर्धा ते एक तास व्यायाम करा. यामध्ये सूर्यनमस्कार, प्राणायाम, सायकलिंग किंवा कोणताही खेळ असू शकतो. लवचिकता आणि स्ट्रेचिंगचा समतोल राखणे गरजेचे आहे.
३. सात्विक आहार: शरीर आणि पचनसंस्था सुदृढ ठेवण्यासाठी शुद्ध, सात्विक आणि शाकाहारी आहार घ्यावा. बाहेरील जंक फूड टाळून घरी बनवलेले अन्न घेणे आरोग्यासाठी हितकारक आहे.
४. पुरेशी झोप: रात्री ६ ते ७ तास शांत झोप घेतल्याने शरीर आणि मन ताजेतवाने होते. यामुळे शरीराची ऊर्जा टिकून राहते आणि नवीन उमेद मिळते.
५. मनाची मशागत: मनाचे आरोग्य हेच शारीरिक आरोग्याचे मूळ आहे. त्यामुळे ध्यानधारणा (Meditation) करा. इतरांशी तुलना न करता, द्वेषमत्सर सोडून आनंदाच्या वाटा शोधा.
प्रतिबंध हाच उपाय
“आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा तो होऊच नये, यासाठी प्रयत्न करणे जास्त महत्त्वाचे आहे,” असा सल्ला डॉ. जोशी यांनी दिला. २०२६ हे वर्ष सर्वांना आरोग्यदायी आणि निरामय जावो, अशी प्रार्थना त्यांनी प्रभू रामचंद्रांच्या चरणी केली आहे.

