दैनिक स्थैर्य | दि. २ जून २०२३ | वाई | येथील ज्येष्ठ समीक्षक व किसन वीर महाविद्यालयाचे माजी मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. पंडित टापरे यांच्या ‘नवसाहित्य : एक अभ्यास’ या समीक्षाग्रंथाला महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने दिला जाणारा सन २०२२ या वर्षाचा ह. श्री. शेणोलीकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुणे येथील एस. एम. जोशी सभागृहात नुकताच ज्येष्ठ इतिहासकार पद्मभूषण डॉ. रामचंद्र गुहा यांचे हस्ते डॉ. टापरे यांना सन्मानित करण्यात आले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे होते. या वेळी डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, कार्यवाह उद्धव कानडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हा समीक्षाग्रंथ पुण्याच्या संस्कृती प्रकाशनाने प्रसिद्ध केला असून सर्वोत्कृष्ट साहित्यकृतीचा पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. टापरे यांचे विविध स्तरावरून अभिनंदन होत आहे.