दैनिक स्थैर्य | दि. ९ एप्रिल २०२३ | फलटण |
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समिती पिंपरद (ता. फलटण) यांच्या वतीने व यश ब्लड बँक, सोलापूर यांच्या सहकार्याने पिंपरद, ता. फलटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये दि. १४ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समिती पिंपरदचे अध्यक्ष निरज मोरे यांनी सांगितले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती ही केवळ एक दिवस साजरी न करता वर्षभर विविध सामाजिक कार्यक्रम, विविध शिबिरे, विद्यार्थी मार्गदर्शन शिबिरे, विविध व्यावसायिक प्रशिक्षण शिबिरे यांच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्यक्रमाने भरगच्च असेल, असे उपाध्यक्ष विकास मोरे यांनी म्हटले आहे.
‘डीजे व फटाकेमुक्त भीमजयंती’ या अभिनव संकल्पनेतून समाजाला वेगळा संदेश दिला जाणार आहे. डीजे व फटाक्यांसारख्या नाहक खर्चाला फाटा देत याच बचतीच्या पैशातून मागासवर्गीय व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, शैक्षणिक साहित्य दिले जाणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत समाज निर्मिती हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल, असा विश्वास संस्थेचे सचिव विक्रांत मोरे यांनी व्यक्त केला आहे.