दैनिक स्थैर्य । दि. १४ ऑक्टोबर २०२२ । फलटण । इंटरनॅशनल ऑलिम्पिकसाठी स्पोर्ट्स् मेडीसीनची आठ जणांची समिती गठीत करण्यात आली असून या समितीत भारताच्यावतीने फलटण येथील फिजीयोथेरेपीस्ट डॉ. रोहन अकोलकर यांची निवड झाली आहे. अशा प्रकारे निवड होणारे देशातील ते एकमेव फिजीयोथेरेपीस्ट आहेत.
यापूर्वी डॉ. रोहन अकोलकर यांना आयसो-कायनेटिक व फिफा मेडिकल एक्ससेलेन्स वैद्यकीय परिषद ल्योन फ्रान्समध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. डॉ. रोहन यांचा फिफा प्रमाणित फुटबॉल स्पोर्ट्स मेडिसिन तज्ञ म्हणून प्रशंसनीय ट्रॅक रेकॉर्ड आहे. डॉ रोहन अकोलकर 2018 च्या फिफा विश्वचषकात रशियामध्ये उपस्थित होते. या फिफा विश्वचषकात त्यांचे योगदान कौतुकास्पद होते. फिफा फुटबॉल एक्स्पर्ट स्पोर्ट्स फिजिओथेरपीस्ट म्हणून खेळाडूंना होणाऱ्या इंजुरीज कश्या प्रकारे टाळता येतील व त्या वरील उपचार ही त्यांची भूमिका होती.
लक्षणीय बाब म्हणजे डॉ. रोहन अकोलकर हे भारताचे पहिले फिफा वर्ल्ड कप मेडिसिन एक्सपर्ट आहेत आणि त्यांना इंटरनॅशनल ऑलम्पिक कमिटीने फुटबॉल मेडिसिन चे सदस्य नियुक्त केले आहे. सदर निवडीबद्दल आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे वैद्यकीय व वैज्ञानिक कमिशनचे अध्यक्ष डॉ उगुर एडर्नर यांनी डॉ. अकोलकर यांचे स्वागत व अभिनंदन केले. स्विझर्लंड येथे आयोजित 5 व 6 सप्टेंबर 2022 रोजी अकराव्या ओलंपिक क्रीडापटूंचा कार्डिओ व्हॅस्क्युलर फिजिकल चेकअप परिषदेत डॉ रोहन अकोलकर सहभागी झाले होते. या परिषदेत ऑलम्पिक खेळाडूंच्या आरोग्य तपासणी बाबत नियम तयार करण्यात आले. ही बाब एक विश्व् कीर्तिमान आहे.
इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार असल्याने डॉ. रोहन अकोलकर यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन व्यक्त होत आहे. कतार येथे होणाऱ्या फिफा फुटबॉल वर्ल्ड 2022 साठी डॉ रोहन अकोलकर उपस्थित असणार आहेत.