
बँकॉक (थायलंड) येथे सुरू असलेल्या ‘U 19 2026 वर्ल्ड बॉक्सिंग फ्युचर्स कप’साठी मूळचे फलटणचे असलेले डॉ. ओंकार देशपांडे यांची भारतीय संघाचे ‘टीम डॉक्टर’ म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
स्थैर्य, फलटण, दि. 11 मार्च : बँकॉक (थायलंड) येथे भरलेल्या ‘अंडर १९ – २०२६ वर्ल्ड बॉक्सिंग फ्युचर्स कप बँकॉक’ (U 19 2026 World Boxing Futures Cup Bangkok) या जागतिक दर्जाच्या बॉक्सिंग स्पर्धेसाठी भारतीय संघाचे ‘टीम डॉक्टर’ म्हणून मूळचे फलटणचे सुपुत्र डॉ. ओंकार देशपांडे यांची मानाची निवड झाली आहे. दिनांक ८ ते १५ मार्च दरम्यान चालणाऱ्या या महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी ते भारतीय संघासोबत बँकॉक येथे उपस्थित असणार आहेत.
जगातील ७८ देशांतील स्पर्धकांचा सहभाग
या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये जगातील तब्बल ७८ देशांमधील सुमारे ५०० बॉक्सिंग स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे. एवढ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय मंचावर भारतीय संघाची वैद्यकीय जबाबदारी सांभाळणे ही फलटणकरांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. डॉ. ओंकार देशपांडे यांनी आपले एम.बी.बी.एस. (M.B.B.S.) शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर पतियाळा येथील ‘नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स’ या प्रतिष्ठित संस्थेतून ‘स्पोर्ट्स मेडिसिन’मध्ये पदव्युत्तर पदवी (Post Graduation) संपादन केली आहे.
फलटणमधून अभिनंदनाचा वर्षाव
डॉ. ओंकार हे फलटण येथील सुप्रसिद्ध डॉक्टर द. ग. ऊर्फ गोटू देशपांडे आणि डॉ. तेजस्विता देशपांडे यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या या आंतरराष्ट्रीय स्तरावरील निवडीमुळे देशपांडे कुटुंबाच्या आणि पर्यायाने फलटण शहराच्या नावलौकिकात मोठी भर पडली आहे. त्यांच्या या गरुडझेपेबद्दल सध्या फलटण शहर व तालुक्यासह सर्वच स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
