डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने चाफळ येथे स्वच्छता अभियान

श्रीराम मंदिर परिसर, गावातील रस्ते, उत्तरमांड नदी परिसर, नदी घाट, बसस्थानक परिसर, स्मशानभूमीची स्वच्छता


स्थैर्य, 3 मार्च, सातारा : चाफळ येथे डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या स्वच्छता अभियानात जिल्ह्यातील विविध निरुपम सेवा बैठकीतील सुमारे 900 सेवेकर्‍यांनी सहभाग नोंदवला. येथेही स्वच्छता अभियान राबवून परिसर चकाचक करण्यात आला.येथील श्रीराम मंदिर परिसर, गावातील सार्वजनिक रस्ते, उत्तरमांड नदी परिसर, नदी घाट, बसस्थानक परिसर, स्मशानभूमी परिसर प्रतिष्ठानच्या पुढाकारातून स्वच्छता मोहीम राबविली. सर्व परिसर, रस्ते, नदीकाठ, नदीपात्र चकाचक होऊन त्याचे रूप पालटले.

परिसरातील वाढते प्रदूषण, नदीपात्रात साचलेला प्लॅस्टिक कचरा, निर्माल्य व घाण लक्षात घेता ही मोहीम आवश्यक होती. या पार्श्वभूमीवर प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी सामाजिक बांधिलकी जपत या उपक्रमाचे आयोजन केले.सकाळी मोहिमेला सुरुवात झाली. मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा गोळा केला. प्लॅस्टिक पिशव्या, बाटल्या, कागद, कपडे, निर्माल्य तसेच टाकाऊ साहित्य ट्रॅक्टर, ट्रॉलीच्या साहाय्याने जमा करून योग्य ठिकाणी नेऊन टाकले.

नदीच्या दोन्ही बाजू स्वच्छ केल्यामुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह मोकळा झाला. श्रीराम मंदिर परिसरही स्वच्छ व सुंदर झाला. या मोहिमेत संस्थेचे स्वयंसेवक, ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. ’स्वच्छ नदी- निरोगी जीवन’ हा संदेश देत नागरिकांत जनजागृती केली. नदीत कचरा टाकू नये, प्लॅस्टिकचा वापर टाळावा, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखावी, अशा आशयाचे फलक लावून प्रबोधनही केले.

उत्तरमांड नदी ही परिसरातील शेती, पिण्याचे पाणी, जनावरांचे पाणी तसेच पर्यावरणासाठी महत्त्वाची जीवनवाहिनी आहे. नदी प्रदूषित झाल्यास त्याचा थेट परिणाम मानवी आरोग्य, शेती उत्पादन आणि नैसर्गिक परिसंस्थेवर होतो. त्यामुळे नदी स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे स्वयंसेवकांनी यावेळी नमूद केले.

या मोहिमेदरम्यान जमा झालेला कचरा ट्रॅक्टर-ट्रॉलीत भरून नियमानुसार विल्हेवाट लावण्यात आली. प्रशासन, स्वयंसेवी संस्था व ग्रामस्थांनी एकत्र येऊन अशा प्रकारची स्वच्छता मोहीम सातत्याने राबविल्यास नदी प्रदूषणावर निश्चितच नियंत्रण मिळवता येईल, असाविश्वास व्यक्त केला. या उपक्रमामुळे परिसर स्वच्छ, सुंदर व प्रदूषणमुक्त झाल्याने नागरिकांकडून धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचे कौतुक करण्यात येत आहे.


Back to top button
Don`t copy text!