दैनिक स्थैर्य | दि. ३ डिसेंबर २०२४ | फलटण |
डॉ. महेश बर्वे यांनी वृक्षारोपण मोहीम हातात घेवून पर्यावरणाचा र्हास रोखण्याची जबाबदारी ज्याप्रमाणे आपल्या खांद्यावर घेतली, त्याच पद्धतीने लिखाणाचाही ध्यास त्यांनी घेतलेला आहे. फलटणमधील बर्वे कुटूंबामध्ये सर्वाधिक डॉक्टर आहेत. त्यांच्यामधून लेखक म्हणून पुढे येणारे एकमेव डॉ. महेश बर्वे हेच आहेत. उत्तम वैद्यकीय सेवा देताना वेगळे विचार डोक्यात येणं आणि ते कागदावर लिहून पुस्तकरूपात प्रकाशित करणं, ही वेगळी देणगी डॉ. महेश बर्वे यांना लाभली आहे, असे गौरवोद्गार फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी काढले.
येथील विद्यावैभव प्रकाशन निर्मित व डॉ. महेश बर्वे लिखित ‘निरगाठ’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. जोशी हॉस्पिटलच्या सभागृहात श्रीमंत संजीवराजे यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी, प्राचार्य रवींद्र येवले, निलीमाताई दाते, विद्यावैभव प्रकाशनचे प्रमुख बकुळ पराडकर, डॉ. महेश बर्वे उपस्थित होते.
श्रीमंत संजीवराजे पुढे म्हणाले, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असला तरी बहुतेकदा आपल्याकडे भाषेला फारसे महत्त्व दिले जात नाही. समजण्यापुरती कामचलाऊ भाषा वापरली जाते. पण भाषा समृद्ध ठेवायची असेल तर ती शुद्ध असली पाहिजे आणि त्यासाठी वाचनाची सवय असणे गरजेचे आहे, असे सांगून वेगवेगळे विचार घेवून वेगळ्या प्रकारचं लिखाण डॉ. महेश बर्वे यांनी केलं आहे. त्यांच हे लिखाण वाचकांना नक्कीच आवडेल, असा विश्वासही संजीवराजे यांनी यावेळी व्यक्त केला.
प्राचार्य रवींद्र येवले म्हणाले, डॉ. महेश बर्वे यांनी ‘निरगाठ’ या पुस्तकात आपल्या सूक्ष्म दृष्टीतून सोप्या भाषेत वेगवेगळे पाठ लिहिले आहेत. त्यांच्या वेगळ्या रचनेतले विचार वाचून आपल्याला वेगळे बळ मिळते.
निलीमा दाते म्हणाल्या, डॉ. महेश बर्वे हे वृक्षारोपण व संवर्धनातून पर्यावरण रक्षणाचे काम करत असतात. लेखक म्हणून विविध अनुभवांना पुस्तक रुपातून त्यांनी शब्दबद्ध केले आहे.
डॉ. प्रसाद जोशी म्हणाले, निष्णात डॉक्टर, निसर्गप्रेमी, टेनिसपटू, फोटोग्राफर यासह लेखक असे विविध पैलू डॉ. महेश बर्वे यांचे आहेत. साधे विषय घेवून विस्तृतपणे लिखाण करून दृढ गाभा देण्याचं काम ते करीत असतात. ‘निरगाठ’ हे पुस्तक वाचकांसाठी वाचनीय आणि विचार करायला लावणारे आहे.
डॉ. महेश बर्वे म्हणाले, वैद्यकीय अभ्यासानुसार गाठ येणं म्हणजे घाबरण आलं, पण ‘निरगाठ’मध्ये घाबरण्यासारखा उहापोह अजिबात नाही. साधक – बाधक विचारांना एकत्र विणून त्यांना पुस्तकरुपात आणलं आहे. वैचारिक गाठी मेंदूला बसल्या आहेत, त्यातल्या काही ‘निरगाठी’ वाचकांकडून सोडवून घेण्याचा हा प्रयत्न आहे, असेही डॉ. महेश बर्वे यांनी आपल्या लालित्यपूर्ण शैलीत सांगितले.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन बकुळ पराडकर यांनी केले. आभार डॉ. सौ. प्राची बर्वे यांनी मानले. सौ. शुभांगी बोबडे यांनी कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवनाने तर समारोप पसायदानाने केला.
कार्यक्रमास महाराष्ट्र साहित्य परिषदेचे फलटण शाखा अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, डॉ. जे. टी. पोळ, डॉ. संजय राऊत, डॉ. किरण नाळे, डॉ. सचिन गोसावी, प्रा. विक्रम आपटे, अॅड. विजय नेवसे, साहित्यिक सुरेश शिंदे, दिलीप जाधव, धनुभाऊ जाधव, अनिल तेली आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.