डॉ.केशवराव धोंडगे यांनी विधिमंडळाची परंपरा अधिक समृद्ध केली – विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांचे गौरवोद्गार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २५ ऑगस्ट २०२२ । मुंबई । ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ.केशवराव धोंडगे यांनी आपल्या कार्यातून महाराष्ट्र विधिमंडळाची परंपरा अधिक समृद्ध केली आहे, असे गौरवोद्गार विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी काढले.

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, माजी खासदार व माजी आमदार डॉ. भाई केशवरावजी शंकरराव धोंडगे यांच्या शतकपूर्तीनिमित्त विधानसभेत त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी श्री.नार्वेकर बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य सर्वश्री बाळासाहेब थोरात, भास्करराव जाधव, श्यामसुंदर शिंदे, हरिभाऊ बागडे त्यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर म्हणाले, डॉ.धोंडगे यांनी हैद्राबाद मुक्तीसंग्राम लढ्यात तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी जनतेच्या न्याय्य हक्कासाठी अनेक आंदोलने केली. सन १९५७ ते १९९० दरम्यान पाच वेळा नांदेड जिल्ह्यातील कंधार मतदारसंघातून ते महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले. सन १९७० मध्ये ते लोकसभेवर निर्वाचित झाले. एक अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी ख्याती मिळवली आहे.

डॉ. धोंडगे यांनी शिक्षण संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी गरीब आणि मागास भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. त्यांच्या या कार्यामुळे अनेक मुले, मुली शिक्षण घेऊन प्रगतीच्या वाटेवर चालत आहेत, असे श्री. नार्वेकर यांनी नमूद केले.


Back to top button
Don`t copy text!