सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी डॉ.जोशी यांची मॅरेथॉन हा उपक्रम कौतुकास्पद : आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १५ ऑक्टोबर २०२२ । फलटण । सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला बळकटी देण्यासाठी डॉ. प्रसाद जोशी प्रतिवर्षी मॅरेथॉनचे आयोजन करतात ही बाब निश्चित कौतुकास्पद आहे, तथापि हा उपक्रम फलटणच्या सामाजिक, सांस्कृतिक परंपरेनुसार सर्वांच्या सहभागाने, त्याची व्याप्ती वाढवून मोठा झाला पाहिजे यासाठी पुढच्या वर्षीपासून डॉ. जोशी यांच्या नेतृत्वाखाली मॅरेथॉन एक इव्हेंट म्हणून सर्वांचा सहभाग वाढविणारा ठरेल यासाठी लक्ष घालण्याची ग्वाही महाराष्ट्र विधान परिषद माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.

जोशी हॉस्पिटल प्रा. लि., आणि ट्रॉमा सेंटर फलटणच्या माध्यमातून डॉ. प्रसाद जोशी, डॉ. सौ. प्राची जोशी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी जागतिक अस्थिरोग निवारण दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या आपली फलटण मॅरेथॉन मधील विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण समारंभात अध्यक्षस्थानावरुन आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. आ. दिपकराव चव्हाण, राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे बुवा विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

विविध वयोगटातील शहर वासीयांना नियमीत व्यायामाची सवय लागावी, त्यांच्या मध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी आणि त्यातून त्यांचे आरोग्य उत्तम रहावे यासाठी डॉ. प्रसाद जोशी प्रतिवर्षी मॅरेथॉनचे आयोजन करतात हे उत्तमच आहे, तथापि त्याची व्याप्ती वाढावी, हा उपक्रम समस्त फलटणकरांचा व्हावा अशी अपेक्षा आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली आहे.

फलटणच्या वैद्यकिय क्षेत्रात भरीव वाढ झाली आहे, विविध क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक साधने, सुविधा येथे उपलब्ध आहेत, मात्र आपला आजार इतरांना न सांगण्याची सवय विशेषत: ग्रामीण भागात आहे, महिलांमध्ये ती अधिक असल्याने अंगावर आजार काढण्याच्या सवयीतून आरोग्य कसे सांभाळणार असा सवाल करीत आता कोणीही आजार न लपवता त्यासंबंधी माहिती देवून उपचार करुन घेण्याची आवश्यकता असल्याचे आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

शरीर संपदा सांभाळण्यासाठी व्यायामा इतकेच उपासनेला महत्व असल्याचे सांगताना व्यायामाने शरीरातील विविध अवयव उत्तम प्रकारे कार्यरत ठेवणे शक्य आहे, त्याचप्रमाणे उपासना व्रत वैकल्ये मानसिक समाधान देणारी असल्याने त्यातूनही आरोग्य सांभाळले जाते किंबहुना व्यायामाला उपासनेची जोड लाभली तर मानवी आरोग्य अधिक सुदृढ होण्यास मदत होईल असा विश्वास ह.भ.प. चारुदत्त आफळे बुवा यांनी व्यक्त केला आहे.

देह देवाचे मंदिर या विषयावर त्यांनी अध्यात्मिक आरोग्य कसे सांभाळावे याविषयी सखोल मार्गदर्शन करताना अनेक संत विचारांचे दाखले देत नागरिकांचे शारीरिक आरोग्य उत्तम राखणे साठी डॉ. प्रसाद जोशी घेत असलेली मेहनत प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. चारुदत्त आफळे बुवा यांनी केले.

प्रारंभी डॉ. प्रसाद जोशी यांनी आ. श्रीमंत रामराजे, आ. दिपकराव चव्हाण, ह.भ.प. चारुदत्त आफळे बुवा यांच्या सह उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्ताविकात आपली फलटण मॅरेथॉन विषयी बोलताना मुंबई, अकोला, नाशिक, पुणे, कोल्हापूर, कराड, सातारा, नीरा, वडूज, दहिवडी, बारामती, लोणंद सह फलटण व परिसरातून यावर्षी विविध वयोगटातील 1500 हुन अधिक स्त्री – पुरुष स्पर्धक सहभागी झाल्याचे निदर्शनास आणून देत सर्व स्पर्धक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले, अनेकांनी मॅरेथॉन आणि आपल्यामुळे व्यायामाची सवय लागल्याचे तर काहींनी आता नियमीत व्यायामाला सुरुवात करीत असल्याचे सांगून उपक्रमाला शुभेच्छा दिल्याचे डॉ. प्रसाद जोशी यांनी निदर्शनास आणून दिले.

जोशी हॉस्पिटल प्रा. ली., फलटणच्या माध्यमातून गेली 22 वर्षे दर्जेदार अस्थि रुग्ण सेवा देत असून सुमारे 25 हजारावर रुग्णांनी याचा लाभ घेतला, 3500 सांधे रोपण आणि 3 हजार मणक्याच्या शस्त्रक्रिया केल्याचे सांगत तालुकास्तरावर सर्वाधिक सांधेरोपण शस्त्रक्रिया केल्याबद्दल गेल्या 4/5 वर्षात 2 राष्ट्रीय व 2 राज्यस्तरीय पारितोषिके प्राप्त झाल्याचे डॉ. प्रसाद जोशी यांनी अभिमानाने निदर्शनास आणून दिले.

क्वालिटी केअर फॉर हेल्दी व्हिजन या संकल्पनेला अनुसरुन खास अभियान राबविताना सर्वांना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही देत त्यासाठी सर्वांनी साथ करावी अशी अपेक्षा डॉ. जोशी यांनी व्यक्त केली.

प्रा. डॉ. सौ. दाणी यांनी सूत्र संचालन, श्यामराव जोशी यांनी ह.भ.प. चारुदत्त आफळे बुवांचा परिचय करुन दिला, तर समारोप व आभार प्रदर्शन डॉ. सौ. प्राची जोशी यांनी मानले.

जोशी हॉस्पिटल प्रा. ली., फलटण आयोजित आपली फलटण मॅरेथॉन मध्ये विविध वयोगटातील सुमारे 1500 स्त्री – पुरुषांनी नाव नोंदणी केली होती. त्यामध्ये 18 ते 30 या जोश पूर्ण युवा गटात स्त्री – पुरुष समावेश होता, 31 ते 45 या सळसळती तरुणाई गटात स्त्री – पुरुष सहभाग होता, 46 ते 64 या प्रगल्भ प्रौढ गटात स्त्री – पुरुष सहभाग होता आणि 65 व त्यावरील अनुभवी ज्येष्ठ गटात ही स्त्री – पुरुष सहभाग होता.

10 कि. मी., 5 कि. मी. आणि 3 कि. मी. अंतराच्या या स्पर्धा होत्या, त्यामध्ये खालीलप्रमाणे यशस्वी स्पर्धक असून त्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

18 ते 30 वयोगट : पुरुष  : विकास पोळ प्रथम, धीरज डांगे द्वितीय, ओंकार लावंड तृतीय.
18 ते 30 वयोगट : स्त्रिया : काव्या देशमुख प्रथम, प्राजक्ता खर्जवा द्वितीय, मोनिका काळे तृतीय.
31 ते 45 वयोगट : 10 कि. मी. : पुरुष : सुनील शिवणे प्रथम, किशोर शेळके द्वितीय, ज्योतीराम चव्हाण तृतीय.
31 ते 45 वयोगट : 10 कि. मी. : स्त्रिया : स्मिता शिंदे प्रथम, अल्मास मुलाणी द्वितीय, सुनिता अरगडे तृतीय.
46 ते 64 वयोगट : 10 कि. मी. : पुरुष : पांडुरंग पाटील प्रथम, विठ्ठल अरगडे द्वितीय, सुधीर पवार तृतीय.
46 ते 64 वयोगट : 10 कि. मी. : स्त्रिया : शोभा देसाई प्रथम, संगीता उबाळे द्वितीय, डॉ. सुनिता निंबाळकर तृतीय.
18 ते 30 वयोगट : 5 कि. मी. : पुरुष : महेश लिंगाप्पा प्रथम, सुजल सोनवणे द्वितीय, सोहम लावंड तृतीय.
18 ते 30 वयोगट : 5 कि. मी. : स्त्रिया : अर्चना कोहकडे प्रथम, सरस्वती भांडे द्वितीय, प्रतीक्षा शिंदे तृतीय.
31 ते 45 वयोगट : 5 कि. मी. : पुरुष प्रशांत अलदर प्रथम, लोकेश माने द्वितीय, डॉ. मयूर फरांदे तृतीय.आप
31 ते 45 वयोगट : 5 कि. मी. : स्त्रिया सौजन्या बगल प्रथम, रुपाली बाबर द्वितीय, वृषाली ढुमे तृतीय.
46 ते 64 वयोगट : 5 कि. मी. : पुरुष धोंडीबा गिरेवाड प्रथम, रमेश चिवलिकर द्वितीय, उदय महाजन तृतीय.
46 ते 64 वयोगट : 5 कि. मी. : स्त्रिया योगीता काळोखे, प्रथम, नेहा पंडित द्वितीय, जयश्री रनवरे तृतीय.
65 व त्याहुन अधिक वयोगट : 3 कि. मी. : पुरुष बाळासाहेब पवार प्रथम, गजानन लावंड द्वितीय, सुहास ताम्हणकर तृतीय.
65 व त्याहुन अधिक वयोगट : 3 कि. मी. : स्त्रिया स्मिता भराडे प्रथम, सुलभा दाते द्वितीय, वत्सला लोकरे तृतीय.
सर्व विजेते आणि सहभागी स्पर्धकांचे आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. दिपकराव चव्हाण, ह.भ.प. आफळे बुवा, डॉ. प्रसाद जोशी यांनी अभिनंदन केले आहे.


Back to top button
Don`t copy text!