स्थैर्य, फलटण, दि. ०३ : डॉ.जे.टी.पोळ यांनी आमच्यावर केलेले आरोप पूर्णपणे खोटे असून घडल्या प्रकाराचे आमच्याकडे व्हिडीओ शुटींग आहे. आम्ही बिलावरुन कुठलाही वाद घातला नसून डॉ.जे.टी.पोळ यांनी आमच्यावर केलेल्या आरोपाचे पुरावे द्यावेत; त्यात जर तथ्य असेल तर आम्ही शिक्षा भोगायला तयार आहोत. आमच्याकडून हॉस्पीटलमधील कुठल्याही कर्मचार्याला दमबाजी झाली नसून उलट आमचा रुग्ण हा हॉस्पीटलमधील कर्मचार्यांच्या हलगर्जीपणामुळे आणि डॉ.जे.टी.पोळ व डॉ.भगत यांच्या दिरंगाईमुळे दगावला आहे. त्यामुळे या सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाडळी खुर्द येथील दत्ता यमपुरे व त्यांच्या सहकार्यांनी केली आहे.
आज दि.3 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास येथील हृदयरोगतज्ज्ञ डॉ.जे.टी.पोळ यांच्या निकोप हॉस्पीटलमध्ये कोरोनावरील उपचार घेताना भाडळी खुर्द येथील दत्ता यमपुरे यांच्या मातोश्रींचे निधन झाले. त्यानंतर आज सकाळी हॉस्पीटल प्रशासनाकडून मयताला अंत्यसंस्कारासाठी न हलवल्याने दत्ता यमपुरे व त्यांच्या नातेवाईक व मित्रपरिवाराकडून हॉस्पीटलमधील कर्मचारी महिलेस शिवीगाळ, दमदाटी झाल्याचा आरोप डॉ.जे.टी.पोळ यांनी केला असून तशी फिर्यादही सदर कर्मचारी महिलेने फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. सदर घडलेल्या प्रकाराबाबत दत्ता यमपुरे यांच्याशी संपर्क साधला त्यावेळी मात्र दत्ता यमपुरे यांनी या आरोपांचे खंडन करुन उलट हॉस्पिटलकडून कोरोना परिस्थितीचा फायदा घेवून कशा पद्धतीने रुग्णांच्या नातेवाईकांची आर्थिक लूट सुरु आहे याचा पाढाच वाचला.
याबाबत यमपुरे यांच्या मित्रपरिवारातील एका सदस्याने सांगितले की, ‘‘दत्ता यमपुरे यांच्या मातोश्रींना निकोप हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर तुमच्या रुग्णाला रेमिडीसीवर इंजेक्शनची गरज आहे. इंजेक्शन दिल्यानंतर तुमचा पेशंट नक्की बरा होईल असे डॉक्टरांनी सांगितले. आम्ही त्यांना सदरचे इंजेक्शन प्रांताधिकार्यांमार्फत उपलब्ध करावे अशी विनंती केली असता प्रांताधिकार्यांकडे इंजेक्शनची कमतरता असून तुमची तुम्ही व्यवस्था करा असे सांगितले. मात्र आम्हाला इंजेक्शन उपलब्ध न झाल्याने डॉक्टर तुम्हीच ते उपलब्ध करा, आम्ही त्याचे पैसे अदा करु असे आम्ही त्यांना सांगितले. त्यानंतर रुग्णाला पाच इंजेक्शन द्यावे लागतील व एक इंजेक्शन 50 हजार रुपयाला मिळेल असे डॉक्टरांनी सांगितले. त्यावर तुम्ही इंजेक्शन द्या आम्ही पैशाची व्यवस्था करतो असे आम्ही सांगितल्यावर सुरुवातीला 50 हजार भरा असे आम्हाला सांगण्यात आले. आम्हीही सदरचे पैसे भरुन उर्वरित इंजेक्शनच्या पैशाची व्यवस्था करतो, असे आम्ही त्यांना सांगितले. त्यावर त्यांनी इंजेक्शनची व्यवस्था झाली आहे असे सांगीतले. त्यानंतर आज दि.3 रोजी मध्यरात्रीनंतर रुग्णाला त्रास होऊ लागल्यानंतर रुग्णाला ऑक्सीजनची गरज आहे असे आम्ही तेथील कर्मचार्यांना सांगितल्यानंतर कुणीही याकडे लक्ष दिले नाही. वेळेत ऑक्सीजनचा पुरवठा त्यांनी केला नाही. या हलगर्जीपणामुळे आमचा रुग्ण मृत्यूमुखी पडला. इतके पैसे घेवूनही रुग्णांना या ठिकाणी योग्य त्या सुविधा पुरवल्या जात नाहीत.’’, असा स्पष्ट आरोप यमपुरे व त्यांच्या मित्रपरिवाराने यावेळी बोलताना केला.
नगरपालिकेची रुग्णवाहिका मयताला नेण्यासाठी येवून दीड तास झाला तरी हॉस्पिटल प्रशासनाकडून बिलाबाबत कार्यवाही होत नव्हती. आम्ही पैसे द्यायला कोणतीही टाळाटाळ केलेली नाही. आम्ही संपूर्ण बिल मागत होतो मात्र इंजेक्शनचे 2 लाख रुपये कागदोपत्री घेता येत नसल्याने डॉक्टर येईपर्यंत वेळकाढू पणा सुरु होता. अशा पद्धतीने या रुग्णालयाकडून तालुक्यातील हजारो रुग्णांशी खेळ खेळला जात आहे. त्यामुळे प्रशासनाने या रुग्णालयाच्या कारभाराची संपूर्ण चौकशी करावी, अशी मागणी सदर प्रकरणी योग्य ती कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशाराही दत्ता यमपुरे व त्यांच्या मित्र परिवाराने दिला आहे.