दैनिक स्थैर्य । दि. १२ मार्च २०२२ । फलटण । कोरोना व ओबीसी आरक्षणामुळे राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका ह्या पुढे ढकलण्यात आलेल्या होत्या. नुकताच जिल्हा परिषदेचा व पंचायत समितीचा कार्यकाल संपला. त्यामुळे रिक्त झालेल्या फलटण पंचायत समितीच्या सभापती पदाचा कार्यभार गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे – पवार यांच्याकडे प्रसासक म्हणून सोपवण्यात आलेला आहे, याबाबतचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी पारित केलेले आहे.
सातारा जिल्ह्यातील सर्व पंचायत समितींचा कार्यकाल संपला आहे. पंचायत समितीचे कामकाज सुरळीत चालावे म्हणून पंचायत समितीच्या सभापती पदाचा कार्यभार प्रसासक म्हणून गटविकास अधिकारी यांच्याकडे देण्याचा आदेश सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी पारित केलेले आहेत. आगामी चार महिने किंवा नुतन सभापती व उपसभापती निवड होईपर्यंत सदरील आदेश लागू राहतील, असेही आदेशात नमुद केलेले आहे.
फलटण पंचायत समितीचा कार्यकाल नुकताच संपला असुन मागील आठवड्यात पंचायत समितीची शेवटची सभा सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी सर्व सदस्यांचा उत्कृष्ट कामकाजाच्या बाबत गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे – पवार यांनी प्रशस्तीपत्र देत सत्कार केला.