दैनिक स्थैर्य । दि. २२ डिसेंबर २०२१ । फलटण । सेवा कार्यात जगभर कार्यरत लायन्स क्लब फलटण शाखेच्या स्थापनेत ५० वर्षांपूर्वी अग्रभागी राहुन त्या माध्यमातून शहर व परिसरातील गरजू नागरिकांना सर्व प्रकारची सेवा देण्यात अखेरपर्यंत कार्यरत असलेले गणपतराव मारुतराव तथा डॉ. जी. एम. धुमाळ यांचे वृद्धापकाळाने आज वयाच्या ९३ व्या वर्षी राहत्या घरी निधन झाले.
लायन्स, रोटरी, जायंट्स वगैरे सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, विविध सहकारी व सामाजिक, सांस्कृतिक संस्थांचे पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसह शहर व परिसरातील डॉक्टर्स, वकील, शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि शहरवासीयांनी रविवार पेठेतील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शन घेवून धुमाळ कुटुंबियांचे सांत्वन केले.
फलटण लायन्स क्लबचे संस्थापक सदस्य आणि क्लबचे तिसरे अध्यक्ष, झोन चेअरमन, विविध समित्यांचे सदस्य म्हणून लायन्स क्लबने त्याकाळात आयोजित केलेली पद्मभूषण डॉ. एम. सी. मोदी यांची मोफत मोती बिंदू नेत्र शस्त्रक्रिया शिबीरे, पोलिओ लसीकरण शिबीरे, मोफत वैद्यकीय तपासणी शिबीरे आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहोळा येथील वास्तव्य कालावधीत वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी, अन्नदान यामध्ये तसेच लायन्स क्लबच्या माध्यमातून उभारण्यात आलेले माळजाई उद्यान, लायन्स मुधोजी नेत्र रुग्णालय यामध्ये त्यांचा अखेरपर्यंत सक्रिय सहभाग होता.
त्याकाळी पिंपोडे ता. कोरेगाव येथुन फलटणला आल्यानंतर त्यांनी तालुक्याच्या ग्रामीण भागातील रुग्णांना आपल्या बुलेट मोटार सायकल वर वाड्यावस्त्यांपर्यंत पोहोचून वैद्यकीय सेवा दिली नंतर रविवार पेठेत सुसज्ज हॉस्पिटल उभारुन सर्वांना उत्तम व सस्मित वैद्यकीय सेवा देण्यात त्यांनी समाधान मानले, सध्या त्यांची दोन्ही मुले धुमाळ हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांचा वैद्यकीय व्यवसाय पुढे चालवीत आहेत.
आज सोमवार दि. २१ रोजी दुपारी फलटण येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.