स्थैर्य, कराड, दि. 12 : कोरोनासंदर्भात दर्जेदार गीतरचना करून, त्यांचे सुंदर सादरीकरण करून समाजप्रबोधनाचे, जनजागृतीचे अनमोल कार्य सेवाभावी वृत्तीने केल्याबद्दल ईगल फौंडेशन या सेवाभावी सामाजिक संस्थेच्या वतीने मसूर (जि. सातारा) येथील प्रेरणादायी लेखक, कवी, अभ्यासू पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते डॉ. बसवेश्वर चेणगे यांना ’कोरोना योध्दा विशेष मानपत्र’ जाहीर करण्यात आले आहे.
याचबरोबर डाकेवाडी (ता. पाटण) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टतर्फेही सामाजिक बांधिलकी व कर्तव्यनिष्ठतेतून कोरोना लढ्यात बहुमोल योगदान देऊन प्रशासनाला सहकार्य केल्याबद्दल डॉ. चेणगे यांचा कृतज्ञता सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे. हे दोन्ही सन्मान प्राप्त झाल्याबद्दल कराड अर्बन को – ऑपरेटिव्ह बँक व मसूर ग्रामपंचायत यांच्या वतीने बँकेच्या मसूर शाखेत डॉ. चेणगे यांचा सरपंच पंकज दीक्षित, उपसरपंच विजयसिंह जगदाळे यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कराड अर्बनचे शाखा व्यवस्थापक प्रकाश पवार, अधिकारी शहाजी जगदाळे, सचिन शहा, बँकेतील सेवक वर्ग, ग्राहक आदी उपस्थित होते.
या सन्मानाबद्दल कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए दिलीप गुरव, प्रशासन विभागाचे महाव्यवस्थापक महेश वेल्हाळ, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस अजितराव पाटील, सामाजिक कार्यकर्ते कल्याण कांबिरे, सचिन दीक्षित, चंद्रकांत चव्हाण, लालासाहेब अवघडे, सूर्यकांत बाजारे, शहाजी जाधव, गणेश जाधव आदिंनी डॉ. चेणगे यांचे अभिनंदन केले.