दैनिक स्थैर्य । दि. १६ एप्रिल २०२२ । फलटण । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त दि. १० ते २३ एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून गुरुवार दि. १४ एप्रिल रोजी सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची व विचारांची भव्य शोभा यात्रा शहरातील प्रमुख मार्गावरुन काढण्यात आलेली होती. शोभा यात्रेचा शुभारंभ विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाला आहे. शोभा यात्रेचा शुभारंभ झाल्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी उपस्थिती लावत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभिवादन करत मार्गदर्शन केलेले होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त आयोजित शोभा यात्रेच्याबाबत दिशाभूल करणाऱ्यांकडे लक्ष देवू नये, अशी माहिती जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष ॲड. अनिकेत अहिवळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
मंगळवार पेठ येथून जयंती मोहत्सव समितीच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीचा शुभारंभ महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती मा. ना. श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी फलटणचे उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजीराव बर्डे, फलटणचे तहसीलदार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी तसेच या भागातील फलटण नगर परिषद सर्व नगरसेवक, असंख्य सामाजिक कार्यकर्ते व भीमसैनिक उपस्थित होते. यावेळी विशेष अतिथी म्हणून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली असल्याचे अध्यक्ष ॲड. अनिकेत अहिवळे यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्यावतीने प्रतिवर्षी विविध कार्यक्रम उपक्रम आयोजित करण्यात येतात, तथापी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या २ वर्षात जयंती महोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला, यावर्षी कोरोना नियंत्रणात असल्याने शासनाने निर्बंध शिथील केले असल्याने यावर्षी जयंती महोत्सव समितीच्या माध्यमातून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले होते, ॲड. अनिकेत अहिवळे यांनी निदर्शनास आणून दिले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्थान काळात फलटण येथे आले असताना शहरातील शेरी नावाच्या भागात त्यांनी प्रजा परिषद घेतली होती, त्या पार्श्वभूमीवर प्रतिवर्षी दि. २३ एप्रिल रोजी त्या जागेवर प्रजा परिषदेचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगून यावर्षी दि. २३ एप्रिल रोजी भिमस्फुर्ती भूमी, मंगळवार पेठ, फलटण येथे सायंकाळी ६ वाजता आंबेडकरी प्रजा परिषदेचे आयोजन करण्यात येत असल्याचे यावेळी अध्यक्ष ॲड. अनिकेत अहिवळे यांनी सांगितले.
सकाळपासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वच राजकीय सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक नेतेमंडळी, कार्यकर्ते व असंख्य अनुयायी भीमसैनिक यांनी बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यामध्ये प्रामुख्याने सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे अध्यक्ष मिलिंद नेवसे, फलटण पंचायत समिती माजी सभापती दत्तात्रय गुंजवटे, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक महादेव माने, ॲड. ऋषिकेश काशीद, सातारा जिल्हा समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष दशरथ फुले, दादासाहेब चोरमले, माजी नगरसेवक अजय माळवे, बाळासाहेब मेटकरी, अमरसिंह खानविलकर, ओबीसी जनमोर्चाचे सर्व पदाधिकारी, शिवसेना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, तसेच भारतीय जनता पक्षाच्या अनेक पदाधिकारी व पत्रकार यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.
यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष ॲड. अनिकेत अहिवळे यांनी कार्याध्यक्ष केतन शांतीलाल सोरटे, सचिव सुशांत देवडत्त अहिवळे, उपाध्यक्ष ज्ञानरत्न महादेव अहिवळे, प्रतिक अशोक गायकवाड, कुणाल किशोर काकडे, खजिनदार गौतम अरुण अहिवळे, सहसचिव सुशांत दिवाकर काकडे, उपसचिव अक्षय विनायक काकडे, संघटक उमेश ज्ञानेश्वर काकडे, उप संघटक निखिल किरण अहिवळे, सहसंघटक अंश तथा अभि काकडे यांची ओळख करुन देत संपूर्ण समिती सदस्य पदवीधर असल्याचे निदर्शनास आणून दिले.
फलटण नगरपरिषदेच्या समोरील असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा व चौक परिसरात आकर्षक देखावा उभारण्यात आलेला होता.
सोमवार पेठेतील गरीब कुटुंबासाठी भिमसैनिकांच्या वतीने मोतीचूर लाडूचे वाटप करण्यात आले तसेच पंचशील रिक्षा स्टॉप बारामती चौक फलटण मंडळाच्या वतीने अन्नदान व माजी सैनिकांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच अनेक भिमसैनीक व मंडळानी सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष ॲड. अनिकेत अहिवळे व जयंती महोत्सव समितीच्या सर्वच पदाधिकारी, भिमसैनिकांनी कठोर परिश्रम घेतले.