कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांताकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ‘समता दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय


स्थैर्य, मुंबई, दि. १४: कॅनडामधील ब्रिटिश कोलंबिया प्रांताने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती दिन ‘समता दिन’ म्हणून साजरा करण्याचा घेतलेला निर्णय मानवतेला डॉ. आंबेडकर यांच्या मानवी हक्क आणि सामाजिक न्यायाच्या आदर्शांनुसार वाटचाल करण्याची प्रेरणा देईल, अशा शब्दात भावना व्यक्त करत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ब्रिटीश कोलंबियाचे लेफ्टनंट राज्यपाल यांचे पत्राद्वारे आभार मानले आहेत.

सामाजिक न्याय आणि समानतेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान लक्षात घेऊन कॅनडामधील ब्रिटीश कोलंबिया प्रांताने दि. 14 एप्रिल रोजी आपल्या प्रांतात ‘समतादिन’ साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा ब्रिटिश कोलंबियाच्या प्रशासनाने गौरव केल्याचा आनंद व्यक्त करत डॉ. राऊत म्हणाले की, जगभरातील लोक आपल्या सामाजिक आणि वांशिक भेदभावा विरूद्धच्या लढाईत डॉ. आंबेडकर यांच्या विचार आणि कार्यातून प्रेरणा घेत आहेत. ब्रिटीश कोलंबियाच्या प्रशासनाची आपल्या प्रदेशात सामाजिक न्यायासाठी आणि वांशिक भेदभावा विरुद्ध लढा देण्याची प्रतिबद्धता प्रशंसनीय आहे.डॉ. आंबेडकर यांच्या भारत तसेच सर्व जगभरातील अनुयायांना डॉ. आंबेडकर यांचा वारसा जगभरातील मानवतेशी सामायिक करताना अभिमान आणि आनंद वाटतो. डॉ. आंबेडकर यांनी सामाजिक न्याय आणि समानतेसाठी अखेरच्या श्वासापर्यंत अविरत संघर्ष केला, असेही डॉ. राऊत आपल्या पत्रात म्हणतात.


Back to top button
Don`t copy text!