डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतःमध्ये रुजवायला हवेत : किशोर बेडकीहाळ; शाळा प्रवेशदिनी समता सैनिक दलाची मानवंदना

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ०८ नोव्हेंबर २०२१ | फलटण | डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगणं महत्वाचेच आहे, परंतु त्यांचे विचार स्वतःत रुजवणं हे त्याहून अधिक महत्वाचे आहे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतःत जर आपण व्यवस्थितपणे रुजवू शकलो तरच प्रबोधनाची, परिवर्तनाची चळवळ गतिमान होणार आहे, असे विचार ज्येष्ठ विचारवंत तथा साहित्यिक किशोर बेडकीहाळ यांनी व्यक्त केले.

श्रीमंत छत्रपती प्रतापसिह हायस्कूल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन तथा विद्यार्थी दिवस सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून किशोर बेडकीहाळ बोलत होते. यावेळी समाजकल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे, शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, हायस्कूलचे मुख्याध्यापक सन्मती देशमाने, विद्यार्थी दिवसाचे प्रवर्तक अरुण जावळे आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान समता सैनिक दलाचे प्रमुख अरुण पोळ यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक स्वरुपात शाळेला मानवंदना देण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडी चे चंद्रकांत खंडाईत ही उपस्थित होते.

बेडकीहाळ पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा लढा हा धर्मसत्तेविरुध्द, राजसत्तेविरुध्द, पुरुषसत्ताक व्यवस्थेविरुध्द, अर्थसत्तेविरुध्दचा लढा होता, हे नीटपणे आपण लक्षात घेतले पाहिजे. सर्व स्तरावर बाबासाहेब लढत होते, म्हणून तर त्यांनी मानवकल्याणाची तत्वमूल्ये संविधानात अंतर्भूत केली.

सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे म्हणाले, विद्यार्थी दिवस हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे. या दिवसाकडे गांभीर्यपूर्वक पहायला हवे. कारण एका महामानवाच्या नावाशी जोडलेला हा दिवस आहे. त्यांच्या विचारकार्याचा जागर करण्याचा हा दिवस आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या नावानं भव्यदिव्य ग्रंथालय आणि इतर रचनात्मक कार्य उभे करणे मला महत्वाचे वाटते. शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांनी आपल्या भाषणात इथून पुढे हा दिवस आणखी मोठ्या ताकदीने कसा करता येईल असा आपण सर्वचजण प्रयत्न करुयात. प्रास्ताविकात संन्मती देशमाने यांनी हायस्कूलबद्दलची एकूण माहिती दिली. विद्यार्थी दिवसाचे प्रवर्तक अरुण जावळे यांनी विद्यार्थी दिवस कसा अस्तित्वात आला आणि तो भारतभर का होणं आवश्यक आहे याबाबत मत नोंदवले. गत वर्षापासून यासाठी एक लाख पंचवीस हजार पत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठविण्याची मोहीम राबवत आसल्याचे जावळे यांनी सांगितले. यावेळी तालुका व जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमात कोल्हापूर येथील शाहीर नाईकवडे, प्रविण धस्के, धनसिंग सोनवणे आदींची भाषणे झाली. समन्वयक राजेंद्र कांबळे, शाहीर श्रीरंग रणदिवे, रमेश इंजे, विलास कांबळे, माणिक आढाव, वैभव गायकवाड, यशेद्र क्षीरसागर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, महिला-पुरुष अणि विद्यार्थी उपस्थित होते. सुत्रसंचालन एम. बी. एकळ यांनी केले. आभार पी. जी. कुचेकर यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!