दैनिक स्थैर्य । दि. १९ ऑक्टोबर २०२२ । सातारा । डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना सन 2022-23 या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील अनूसूचित जाती मधील लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी विजय माईनकर यांनी केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेमध्ये नवीन विहिर खुदाई, जुनी विहिर दुरुस्ती विद्युत पंप खरेदी, वीज जोडणी, शेततळे अस्तिरीकरण, सोलर पंप, इनवेल बोअर व ठिबक सिंचन या घटकांचा समावेश आहे. विहिर खुदाईसाठी लाभार्थी यांचे नावावर कमीत 0.40 हे. क्षेत्र असणे आवश्यक आहे. तसेच लाभार्थीचे आर्थिक वर्षातील एकूण उत्पन्न 1.50 लाखाच्या आत असणे आवश्यक आहे. जुनी विहिर दुरुस्ती व इ.मा. घटकासाठी शेतकऱ्याच्या नावे कमीत कमी 0.20 हे. क्षेत्र असणे आवश्यक आहे. नवीन विहिर खुदाईसाठी 2.50 लाख, जुनी विहिर दुरुस्तीसाठी 50 हजार रुपये, वीज जोडणीसाठी जास्तीत जास्त 10 हजार रुपये, इनवलेल बोअरसाठी 20 हजार रुपये तसेच शेततळे अस्तिरीकरण करण्यासाठी जास्तीत जास्त 1 लाख रुपये अनुदान देय आहेत.
तरी इच्छुक लाभार्थ्यांनी पंचायत समितीच्या कृषि विभागाशी अथवा जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाशी संपर्क साधावा, असेही आवाहन श्री. माईनकर यांनी केले आहे.