दैनिक स्थैर्य । दि. १४ एप्रिल २०२२ । नाशिक । जगभरातील देश डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या राज्य घटनेचा अभ्यास करून त्यांच्या देशाची घटना तयार करतात. जगभरात केवळ धर्माच्या नावाने निर्माण झालेल्या राष्ट्रात कायमच उलथापालथ होत आहे. मात्र भारतासारख्या खंडप्राय देशाला एकत्रित ठेवण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेने केलेले असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतरत्नच नव्हे तर विश्वरत्न आहेत. केवळ आपल्या देशावरच नाही तर त्यांचे संपूर्ण जगावर उपकार आहेत असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
येवला येथील मुक्तिभूमी स्मारक परिसरात प्रशिक्षण केंद्र, ग्रंथालय-वाचनालय, कर्मचारी निवासस्थान, अतिथी निवासस्थान बांधणे व इतर सुविधा पुरविणे या एकूण १५ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे आज भूमिपूजन आज मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी विधान परिषदेचे आमदार नरेंद्र दराडे, माजी खासदार समीर भुजबळ, संजय बनकर, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त भगवान वीर, येवला प्रांताधिकारी ज्योती कावरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता व्ही. बी. पाटील, येवला नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, बार्टी पुण्याच्या पल्लवी पगारे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रमुख तीन टप्पे असून यामध्ये मुक्ती भूमी, दीक्षा भूमी आणि चैत्य भूमी या तीनही भूमीना विशेष असे महत्व आहे. अनेक प्रयत्नांनंतर अन्याय अत्याचार थांबत नसल्याने हिंदू म्हणून जन्माला आलो हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा केली. येवल्यातील मुक्ती भूमीवर त्यांनी
धर्मांतराची ही घोषणा केली. रक्ताचा एक थेंब न सांडता देशातील ७ कोटी लोकांमध्ये धर्मपरिवर्तन घडवून आणले. जगातील ही एकमेव अशी घटना आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे पदस्पर्श लाभल्यामुळे हे स्थान अतिमहत्वाचे तीर्थस्थळ बनलेले आहे. या भूमीवरील माती आपल्या कपाळावर लावून या भूमीचा सन्मान राखावा असे ते म्हणाले.
ते म्हणाले की, भारतीय राज्यघटना ही सर्वोत्तम आहे. मात्र ज्यांच्या हातात सत्ता जाईल ते या घटनेचा वापर कसा करतील त्यावर तिचे श्रेष्ठत्व ठरणार आहे. एकाला एक आणि एकाला एक न्याय दिला तर लोकशाही टिकणार नाही. या राज्यघटनेला हात लावणे तर दूर याकडे वाकड बघण्याची कुणाची हिम्मत होता कामा नये. अंधश्रद्धेचा पगडा वाढवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. अंधश्रद्धेच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांचा बळी जातो आहे. अन्यायाच्या विरुद्ध हा लढा लढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू व डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे आपल्याला प्रेरणा देतात त्यामुळे हेच आपले आदर्श असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ते म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्व असलेल्या गावांचा विकास करण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. त्यानुसार या ऐतिहासिक स्थळाच्या विकास कामांना मंजुरी प्रदान केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्री मंडळाचा शपथविधी झाल्यानंतर सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी पार पडत असतांना सर्वात प्रथम मुक्तिभूमीच्या विकासाचे हे काम मंजूर करण्यात आले. मध्यंतरी कोरोना आर्थिक निर्बंधामुळे हे काम थांबले होते. मात्र आता कोरोनानंतर पुन्हा पाठपुरावा करून या कामासाठी निधी मंजूर करून घेतला असून मुक्तिभूमी स्मारकाच्या परिसराला जोडणाऱ्या रस्त्यांचा सुध्दा विकास करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, या जागेचे महत्त्व लक्षात घेवून, सदरील जागेवर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पहिल्या टप्प्यात विश्वभुषण स्तुपाचे १३ कोटी किंमतीचे बांधकाम पूर्ण झालेले. फेज १ अंतर्गत येवला येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची ऐतिहासिक मुक्तिभूमी चा विकास करून याठिकाणी ठिकाणी भगवान गौतम बुद्ध व बाबासाहेबांचे भव्य स्मारक निर्माण करण्यात आलेले आहे. पुढील टप्प्यातील मुक्तिभूमीच्या विकासाची कामे अतिशय दर्जेदार होईल यासाठी अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देण्यात यावे. येवला शहराला हे एक प्रमुख स्थान निर्माण झाले असून राज्यातील वैभव असलेलं हे शहर मुक्तिभूमीमुळे अधिक प्रसिद्ध होईल असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, फेज २ अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभुमी स्मारक येवला या ऐतिहासिक स्थळांचा विकास करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्याकडून या स्थळाचा विकास करण्यासाठी १५ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळालेली आहे. येवला मुक्तिभूमी स्मारक परिसरात फेज दोन अंतर्गत प्रशिक्षण केंद्र,
ग्रंथालय, वाचनालय, कर्मचारी निवासस्थान, संरक्षण भिंत, अॅम्पीथिएटर, लॅण्डस्केपिंग, अतिथिगृह आदी विकास कामे करण्यात येऊन स्मारकाचा विकास करण्यात येत आहे. यामध्ये तळमजल्यावर १२ भिक्कू निवासस्थानांचे बांधकाम, प्रशासकीय कार्यालय, कॅन्टीन, किचन, महिला पुरुष प्रसाधन गृह बांधण्यात येणार आहे.पहिल्या मजल्यावर ३ भिक्कू पाठशाला, प्रत्येकी १ मिटिंग हॉल, पाली व संस्कृत संशोधन केंद्र, ग्रंथालय, आर्ट गॅलरी, दृक्षश्राव्य कक्ष, महिला व प्रसाधन गृह बांधण्यात येणार आहे दुसऱ्या मजल्यावर एकूण ६ बौद्ध भिक्कू विपश्यना केंद्रासाठी बांधकाम करण्यात येणार आहे. तसेच ३०० लोक क्षमतेचे अॅम्पीथिअटर बांधकाम, स्टेजचे बांधकाम, १ व्हीआयपी कक्षाचे बांधकाम, २ ग्रीन रूमचे बांधकाम, १ स्टोअरचे बांधकाम करण्यात येणार असून वर्ग ३ कर्मचाऱ्याकरिता १ निवासस्थान, वर्ग ४ कर्मचाऱ्याकरिता ३ निवासस्थान, सिक्युरिटी केबिन, संरक्षण भिंत, अंतर्गत मार्ग, वाहनतळ व बागबगीचा विकसित करण्यात येणार असून महात्मा फुले, छत्रपती शाहू, डॉ.आंबेडकरांच्या अनुयानांनी या वस्तूचा अधिक फायदा घ्यावा असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
भूमिपूजन समारंभ सुरू असतानाच ना छगनरावजी भुजबळ साहेबांना भ्रमणध्वनीवरून केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना रामदास आठवले यांनी मुक्तिभूमी च्या विकासासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आभार व्यक्त केले.
यावेळी आमदार नरेंद्र दराडे, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मायावती पगारे, माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश वाघ, प्रदेश उपायुक्त भगवान वीर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही.बी.पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.