
शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाच्या १५व्या अधिवेशनात डॉ. अशोक शिंदे यांच्या ‘गाव पांढरीच्या वैभवखुणा’ ग्रंथाला ‘ललितेत्तर साहित्य पुरस्कार’.
स्थैर्य, फलटण, दि. २० फेब्रुवारी : शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ (शिविम), कोल्हापूर व सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, सातारा आयोजित राष्ट्रीय चर्चासत्र व शिविमचे १५ वे अधिवेशन नुकतेच सातारा येथे उत्साहात पार पडले.
या अधिवेशनात मुधोजी महाविद्यालय, फलटण येथील मराठी विभागातील प्राध्यापक डॉ. अशोक शिंदे यांना त्यांच्या ‘गाव पांढरीच्या वैभवखुणा’ या ग्रंथासाठी ‘ललितेत्तर साहित्य पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी शिवाजी विद्यापीठ मराठी अधिविभाग प्रमुख व ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. रणधीर शिंदे, शिविमचे अध्यक्ष डॉ. भरत जाधव, अधिवेशनाध्यक्ष प्रा. डॉ. रफिक सूरज, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे आदी मान्यवर उपस्थित होते.
निवृत्त प्राचार्य डॉ. प्रकाश कुंभार यांच्या ५० हजार रुपयांच्या देणगीच्या व्याजातून दरवर्षी दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारासाठी यंदा डॉ. शिंदे यांच्या ‘गाव पांढरीच्या वैभवखुणा’ या ग्रंथाची निवड करण्यात आली होती.
अठरा ललित लेखांचा समावेश असलेल्या या ग्रंथात ग्रामीण व कृषिजीवनातील नामशेष होत चाललेल्या साधनांचे सांस्कृतिक, सामाजिक व ऐतिहासिक महत्त्व ललित शैलीत मांडले आहे. आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या युगात विस्मृतीत जाणाऱ्या या वारशाचे सजीव चित्रण या ग्रंथात आढळते.
या ग्रंथास ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांची प्रस्तावना तर प्रसिद्ध व्याख्याते डॉ. यशवंत पाटणे यांची पाठराखण लाभली आहे. सातारा येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रकाशन मंडपात या ग्रंथाचे प्रकाशन झाले होते.
डॉ. शिंदे यांच्या या यशाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
ग्रामीण संस्कृतीच्या जतनासाठी केलेल्या या साहित्यिक कार्यामुळे फलटणच्या शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे.

