दैनिक स्थैर्य | दि. ७ डिसेंबर २०२४ | फलटण |
निंभोरे येथील डॉ. आंबेडकरांच्या प्रस्तावित प्रति चैत्यभूमी स्मारकास तीन कोटींचा निधी देणार असल्याची ग्वाही आमदार सचिन पाटील यांनी दिली. ‘महापरिनिर्वाणदिनी’ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आमदार सचिन पाटील येथे आले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६८ वा महापरिनिर्वाण दिन ६ डिसेंबर रोजी दादर येथील चौपाटीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पार्थिव देहावर लाखो अनुयायांच्या साश्रूनयनांच्या साक्षीने अंत्यसंस्कार करण्यात येतात, त्याच भूमीला ‘चैत्यभूमी’ म्हणून ओळखले जाते. याच ठिकाणी देशभरातून लाखो भीम अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येतात. याच ठिकाणाहून संपूर्ण देशभरातून आलेल्या काही तत्कालीन अनुयायांनी डॉ. बाबासाहेबांच्या अस्थी आपल्या मूळ गावी घेऊन जाऊन त्यांचे जतन केले आहे. महाराष्ट्र देशाच्या अनेक भागांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी या दर्शनासाठी ठेवल्या आहेत. फलटण तालुक्यातील निंभोरे या गावी अशाच पद्धतीने डॉ. आंबेडकरांच्या अस्थींचे जतन करून ठेवण्यात आले आहे. दरवर्षी १४ एप्रिल, ६ डिसेंबर या दिवशी फलटणसह तालुक्यातील अनेक गावांमधून भीम अनुयायी, भीमसैनिक निंभोरे या गावी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी जातात. निंभोरे येथील या वास्तूला ‘प्रती चैत्यभूमी’ या नावाने ओळखले जाते.
नवनिर्वाचित आमदार सचिन कांबळे पाटील यांनी फलटण शहर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करून निंभोरे या ठिकाणी जाऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थींचे दर्शन घेतले. यावेळी लोकांच्या मागणीचा विचार करून त्यांनी निंभोरे या गावी चैत्यभूमीच्या धर्तीवर नियोजित प्रति चैत्यभूमीसाठी ३ कोटी रुपयांचा निधी नवीन स्मरकासाठी आमदार फंडातून देण्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेमुळे निंभोरेसह संपूर्ण तालुक्यातील भीमसैनिकांच्या वतीने त्याचे आभार मानण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक सचिन अहिवळे, सामाजिक कार्यकर्ता सुधीर अहिवळे, कामगार संघटना अध्यक्ष सनी काकडे, निंभोरे ग्रामपंचायत सदस्य अमित रणवरे, धीरज कांबळे, भाजपा अनुसूचित जाती तालुकाध्यक्ष राजेंद्र काकडे, सनी मोरे, विकी बोके व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.