निंभोरे येथे होणार डॉ. आंबेडकरांचे भव्य स्मारक व प्रेरणाभूमी; अ‍ॅड. कांचनकन्होजा यांच्या प्रयत्नांना यश

तात्काळ प्रस्ताव देण्याची फलटण पंचायत समितीची ग्रामपंचायतीस सूचना

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २५ फेब्रुवारी २०२५ | फलटण |
निंभोरे (ता. फलटण) येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक व प्रेरणा भूमी बांधण्याबाबत जागा भूसंपादन करण्याबाबतचा प्रस्ताव व पर्यटनस्थळ जाहीर करण्याचा प्रस्ताव शासनास तात्काळ सादर करण्यात यावा, अशी सूचना फलटण पंचायत समितीने निंभोरेचे सरपंच व ग्रामविकास अधिकार्‍यांना केली आहे.

निंभोरे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक व प्रेरणाभूमी तसेच पर्यटनस्थळ जाहीर करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. कांचनकन्होजा खरात यांनी फलटण पंचायत समितीकडे पत्राद्वारे केली होती. त्यास फलटण पंचायत समितीने मान्यता देऊन स्मारकाबाबतचा प्रस्ताव सादर करण्यासाठी ग्रामपंचायतीस सांगितले आहे.

अ‍ॅड. कांचनकन्होजा खरात यांनी निवेदनात म्हटले होते की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन दि. ६ डिसेंबर १९५६ रोजी झाले. तेव्हा महाराष्ट्रातील काही पँथरांनी मुंबईवरून माघारी जाताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी आपापल्या बरोबर घेऊन गेले. ती ठिकाणे म्हणजेच अमरावती, हातकणंगले, मुंबई, लातूर, सोलापूर तसेच निंभोरे (फलटण, जि. सातारा) इ. या अस्थीकलशांची स्थापना त्या-त्या ठिकाणच्या सर्व मंडळींनी एकत्र येऊन केली होती. त्यातील एक म्हणजेच निंभोरे गावचे भीमसैनिक होय. या ठिकाणी कमी जागेत बारीक अशा समाजमंदिरात अस्थीकलशाची स्थापना केलेली आहे. येथे हजारोंच्या संख्येने येणारे भीमसैनिक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे अनुयायी अस्थीकलशाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. त्यांना उभे राहण्यासाठीही पुरेशी जागा नाही. तसेच गाड्या पार्किंगसाठी जागा नसल्याने भीमअनुयायांची गैरसोय मोठ्या प्रमाणात होते. म्हणून निंभोरे ग्रामस्थ तसेच सर्व फलटणकरांची निंभोरे येथे जमीन संपादित करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक व प्रेरणाभूमी तसेच पर्यटनस्थळ व्हावे, अशी मागणी आहे.


Back to top button
Don`t copy text!