
दैनिक स्थैर्य । 15 एप्रिल 2025। सातारा । भारतात समतेचा विचार अनेक वर्षांपासून मांडला जात आहे. परंतू खर्याअर्थाने समतेला कायद्याचा आधार देऊन सर्व भारतीयांना समान पातळीवर आणण्याचे ऐतिहासिक काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून पूर्ण केले. आज काही वर्णवर्चस्ववादी लोक ही घटनाच उद्ध्वस्त करण्याचे काम करीत आहेत. त्यांना रोखण्यासाठी सर्वांनी एकजुटीने लढा उभा केला पाहिजे, असे उदगार प्रदेश काँग्रेसचे सचिव राजेंद्र शेलार यांनी काढले.
यावेळी सातारा येथील काँग्रेस भवनात डॉ. आंबेडकर जयंतीदिनी बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी राजेंद्र शेलार बोलत होते.
कार्यक्रमास जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस नरेश देसाई, प्रदेश पतिनिधी बाबासाहेब कदम, रफिकशेठ बागवान, जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष जगन्नाथ कुंभार, सातारा शहर अध्यक्षा सौ. रजनीताई पवार, अॅड. दत्ता धनावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
राजेंद्र शेलार पुढे म्हणाले की, संविधानावर आधारित कायद्याचे राज्य स्थापन करण्यात काँग्रेस पक्षाची मोठी भूमिका होती. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्व भारतीयांना समान दर्जा व समान अधिकार देण्यासाठी स्वीकारण्यात आलेले संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रमातून निर्माण केले. डॉ. बाबासाहेबांची घटना म्हणजे समतेचा विचार कायद्यात रूपांतरित करणारी जगाच्या इतिहासातील महान, क्रांतिकारक घटना आहे. मात्र सध्या डॉ. बाबासाहेबांच्या घटनेवर चोहोबाजूनी हल्ले होत आहेत. देशात कायद्याचे राज्य राहिलेले नाही. त्यासाठी समाजातील सर्व लोकांनी एकत्रित लढा उभा केला पाहिजे. विशेषतः काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यासाठी आघाडीवर राहून काम केले पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस नरेश देसाई यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ कुंभार, जावळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संदीप माने, सौ. रजनीताई पवार, आरबाज शेख, संभाजी उतेकर यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी अन्वर पाशा खान, सुभाष कांबळे, अमोल शिंदे, प्राची ताकतोडे, सौ. माधवी वर्पे, सुषमा राजेंघोरपडे, विजय मोरे आदी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. कोरेगाव मार्केट कमिटीचे संचालक आनंदराव जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.