
स्थैर्य, फलटण, दि. 5 ऑक्टोबर : डॉ. अमॅदू ट्राओरे, बुर्कीना फासो, पश्चिम आफ्रिका हे पशुजैवतंत्रज्ञान विषयातील तज्ञ संशोधक व प्राध्यापक निंबकर कृषि संशोधन संस्था, पशुसंवर्धन विभाग ह्यांनी विकसित केलेल्या ‘नारी सुवर्णा’ ह्या जुळी कोकरे देणार्या मेंढीविषयी शास्त्रीय माहिती घेण्यासाठी 6 ते 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत फलटणला येणार आहेत.
व्हिएन्ना, ऑस्ट्रिया येथील ‘आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी’ ((IAEA)यांच्यातर्फे त्यांना ह्या भेटीसाठी पाठ्यवृत्ती दिली गेली आहे. ‘नारी सुवर्णा’ पैदास कार्यक्रम, त्याअंतर्गत कोकरांच्या डी.एन.ए.चे विश्लेषण करून जुळी कोकरे होण्याच्या जनुकाची तपासणी, गेल्या वीस वर्षांमधील मेंढ्यांच्या नोंदी ह्या सर्वांची माहिती त्यांना पशुसंवर्धन विभागाच्या संचालिका डॉ. चंदा निंबकर, सहयोगी संचालक डॉ. प्रदीप घळसासी व प्रयोगशाळा तंत्रज्ञान सल्लागार सौ. पद्मजा घळसासी देतील. बुर्कीना फासो ह्या अविकसित देशात अशा प्रकारचा पैदास कार्यक्रम प्रस्थापित करून मेंढ्यांच्या उत्पादनात सुधारणा करता येईल का ह्याची चाचपणी डॉ. ट्राओरे करतील. फलटणमधून महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणमध्ये मेंढपाळांपर्यंत पोहोचलेली ‘नारी सुवर्णा’ मेंढीची कीर्ती आता आफ्रिकेपर्यंत पोहोचणार आहे.