दैनिक स्थैर्य । दि. 05 ऑक्टोबर 2021 । फलटण । डॉ. अक्षय बरडकर यांची वैद्यकीय अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा शिक्षक संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला. डॉ.अक्षय बरडकर यांच्या यशामागे चिकाटी आणि जिद्द हेच कारण आहे. हाच आदर्श इतर मुलांनी घ्यावा, असे गौरवोद्गार शिक्षक संघाचे अध्यक्ष दिलीप मुळीक यांनी सदरच्या सत्कार समारंभाप्रसंगी केले.
डॉ. अक्षय हनुमंत बरडकर हे जिल्हा परिषद शाळा धुळदेव (ता.फलटण) येथील आदर्श शिक्षीका सौ.शकुंतला हनुमंत बरडकर (घनवट) यांचे चिरंजीव असून त्यांचे प्राथमिक शिक्षण पळसकर वस्ती, राजुरी व माध्यमिक शिक्षण मंडळाचे हायस्कूल व मुधोजी कॉलेज फलटण येथे झाले. त्यानंतर एम.बी.बी.एस. पदवी घेण्याची जिद्द मनाशी धरून त्यांनी परदेशात रशियात जाऊन शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाची परीक्षा उत्तीर्ण होऊन इंटर्नशिप पूर्ण केली. दिल्ली आणि महाराष्ट्र वैद्यकीय परिषद प्रमाणपत्र मिळवले. तसेच महाराष्ट्र वैद्यकीय मंडळाकडून होणार्या निवड परीक्षा देऊन त्यांची वैद्यकीय अधिकारी म्हणून सातारा जिल्ह्यामध्ये गुणवत्तेनुसार निवड झाली आहे.
सत्कार कार्यक्रमाला शिक्षक संघाचे सरचिटणीस राजेंद्र बोराटे, प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक अनिल शिंदे, शिक्षक बँकेचे माजी संचालक व ज्येष्ठ नेते आण्णासो शेवते, माजी शिक्षण विस्तार अधिकारी रा. शि. माने, शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष हनुमंत चिंचकर, बरडकर कुटुंबीय उपस्थित होते.