
स्थैर्य, फलटण, दि. ७ ऑक्टोबर : श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या तरडगाव येथील सौ. वेणूताई चव्हाण हायस्कूलने तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये व्हॉलीबॉल आणि कबड्डी या दोन्ही क्रीडा प्रकारांत विजेतेपद पटकावून दुहेरी यश संपादन केले आहे.
तरडगाव येथे झालेल्या मुलींच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत विद्यालयाच्या १४ वर्षे आणि १७ वर्षे मुलींच्या दोन्ही गटांनी विजेतेपद मिळवले. गेली अनेक वर्षे मुलींच्या गटात तरडगावचा संघ अजिंक्य राहिला असून, या दोन्ही संघांची उंब्रज येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
त्याचबरोबर, आदर्की येथे झालेल्या मुलांच्या कबड्डी स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावले. उपांत्य फेरीत मुधोजी हायस्कूलचा तर अंतिम फेरीत ब्रिलियंट ॲकॅडमीचा पराभव करून संघाने हे यश मिळवले. या संघाची नेले (किडगाव) येथे होणाऱ्या जिल्हा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या सर्व संघांना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक पंकज पवार यांनी मार्गदर्शन केले.
या यशाबद्दल श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा सविता सूर्यवंशी (बेडके), मानद सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके), नियामक मंडळ सदस्य महेंद्र सूर्यवंशी (बेडके), तालुका क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे, प्रशालेच्या प्राचार्या एस. जी. काकडे, पर्यवेक्षक निंबाळकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि ग्रामस्थांनी विजयी संघांचे अभिनंदन केले आहे.