स्थैर्य, सोलापूर, दि.१८: सोलापूर जिल्ह्यातील कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्राची संख्या वाढवून दररोज सध्याच्या दुप्पट नागरिकांना लसीकरण करण्याचे नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिल्या.
कोविड प्रसाराला आळा घालण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज आढावा बैठक घेतली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात आज झालेल्या या बैठकीत व्यासपीठावर महापालिका आयुक्त पि. शिवशंकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, उपायुक्त वैशाली कडूकर उपस्थित होते.
सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील कोविड बाधितांची संख्या वाढत आहे. या परिस्थितीत ट्रेसिंग, टेस्टींग आणि ट्रीटमेंट वाढवले पाहिजेच, त्याचबरोबर लसीकरणाचा वेग वाढवायला हवा, असे श्री. शंभरकर यांनी सांगितले.
सध्या शहर आणि जिल्ह्यात दररोज सुमारे सात हजार जणांना लस दिली जात आहे. आता नवीन केंद्रे निश्चित करुन येत्या आठवड्यात दररोज चौदा हजार जणांना लस देण्याचे नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिल्या.
सोलापुरात सध्या 91 शासकीय लसीकरण केंद्रात आणि 25 खासगी दवाखान्यात लस दिली जाते. आता जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण इस्पितळात लस दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे शासनाची मान्यता घेऊन, खासगी दवाखान्यातील लसीकरण केंद्राचीही संख्या वाढवली जाणार असल्याचे लसीकरण समन्वयक डॉ. अनिरुध्द पिंपळे यांनी सांगितले.
शहर आणि जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्यासाठी नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या.
आश्विनी ग्रामीण रुग्णालय येथे येत्या तीन चार दिवसात टेस्टींगला सुरुवात होईल. त्यानुसार दररोज सुमारे दोन हजारहून अधिक आरटीपीसीआर टेस्ट करता येतील, असे वैशंपायन महाविद्यालयाच्या डॉ. शेख यांनी सांगितले.
बैठकीस उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. बिरुदेव दुधभाते, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त अभय डोंगरे, उपायुक्त धनराज पांडे आदी उपस्थित होते.