काळजी करू नका, सर्वतोपरी मदत करणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घुग्गुस येथील भूस्खलन पीडितांना दिला धीर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २९ ऑगस्ट २०२२ । चंद्रपूर । घुग्गुस येथील आमराई वॉर्डात घडलेली भूस्खलनची घटना अतिशय गंभीर आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र परिसरातील इतर घरांनासुद्धा असा धोका राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. भूस्खलनाचा धोका असलेल्या घरांना मुख्यमंत्री सहायता निधीतून तात्काळ 10 हजार रुपये देण्यात येईल, असे वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

घुग्गुस येथे भूस्खलन झालेल्या नामदेव मडावी यांच्या घराची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी नागरिकांना धीर दिला. तसेच चिंता करू नका, सर्वतोपरी मदत केली जाईल, असेही आश्वस्त केले.

श्री. मुनगंटीवार म्हणाले, आजूबाजूच्या घरांनासुद्धा अशा प्रकारचा धोका असल्याने नागरिकांच्या घरातील सामान काढून त्यांना वेकोलीच्या निवासी वसाहतीत स्थलांतरित करावे. अन्यथा दुसरीकडे राहण्याची व त्यांच्या जेवणाची, स्वच्छतेची व आदी बाबींची व्यवस्था वेकोलीने करावी. यात कोणतीही हयगय होऊ देऊ नये. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत नागरिकांची आरोग्य तपासणी त्वरित करून घ्यावी. तातडीची मदत म्हणून धोका असलेल्या कुटुंब प्रमुखांना प्रत्येकी तीन हजार रुपये त्वरित देण्याच्या सूचना त्यांनी देवराव भोंगळे यांना दिल्या.

घडलेल्या घटनेबाबत डायरेक्टर जनरल ऑफ माइनिंग सेफ्टी यांना त्वरित बोलवावे. यासंदर्भात लवकरच उच्चस्तरीय बैठक घेऊन उपाययोजनाची दिशा निश्चित करण्यात येईल. धोका असलेल्या घरांची यादी जिल्हा प्रशासनाने फायनल करावी. धोक्यातील घरांना रेड बोर्ड लावून डेंजर एरिया मार्क करावा. घुग्गुस येथील घटनेबाबत केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्री श्री. भूपेंद्र यादव, कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासोबत बोलणी केली जाईल. तसेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा अवगत करून घडलेल्या घटनेची चौकशी केली जाईल. ज्या घरांना धोका आहे, अशा कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 10 हजार रुपये मिळवून देऊ, असे त्यांनी सांगितले.

संपूर्ण परिसराचा नकाशा पाहून वेकोलीने पोकळ जागेतील खड्डा रेती किंवा अन्य मटेरियल टाकून त्वरित भरावा. वेकोलीमुळे जीवाला धोका असल्यामुळे येथील नागरिकांनी पुनर्वसनाचा प्रश्न उपस्थित केला आहे. वेकोली आणि म्हाडाची मदत घेऊन नियमानुसार पुनर्वसन करता येईल का, याची पडताळणी सुद्धा केली जाईल. याबाबत जिल्हाधिकाऱ्‍यांनी आढावा घ्यावा, असेही श्री. मुनगंटीवार म्हणाले.

यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, विकोलीचे महाप्रबंधक आभास सिंग, तहसीलदार निलेश गौंड, देवराव भोंगळे, मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, पोलीस निरीक्षक बबन फुसाटे, नायब तहसीलदार सचिन खंडारे आदी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!