
दैनिक स्थैर्य । 28 मे 2025। फलटण । अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने गेल्या आठवड्यापासुन संततधाव व मुसळधार पावसाने तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचे बघायला मिळाले आहे. तरी नागरिकांनी काळजी करु नका; आम्ही तुमच्यासोबत आहे, असे आश्वासन आमदार सचिन पाटील व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांनी दिले.
फलटण तालुक्याच्या पुर्व भागामध्ये आसू गावात स्थळपाहणी करताना आमदार सचिन पाटील व श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे यांच्यासह विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांनी स्पष्ट केले की, आमदार सचिन पाटील यांच्यासमवेत आम्ही सर्वजण सातत्याने प्रशासनाच्या संपर्कात आहोत. अगदी कमीत कमी नुकसान झाले असले तरी सुध्दा त्याचा पंचनामा करण्याचे निर्देश दिले आहेत.
यावेळी प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर व तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी तलाठी, मंडलाधिकारी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांना पंचनाम्याबाबत निर्देश दिले.